Petrol-Diesel Price Hike: अवघ्या चार दिवसांत दुसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महागलं! महाराष्ट्रातील अनेक शहरांत पेट्रोल 109 रुपयांच्या पार

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाल्याने सर्वसामान्यांच्या खिशाला मोठा फटका बसला आहे.

Petrol-Diesel Price Hike: अवघ्या चार दिवसांत दुसऱ्यांदा पेट्रोल-डिझेल महागलं! महाराष्ट्रातील अनेक शहरांत पेट्रोल 109 रुपयांच्या पार

Fuel Price: देशभरातील नागरिकांना पुन्हा एकदा महागाईचा मोठा झटका बसला आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अवघ्या चार दिवसांत दुसऱ्यांदा वाढ करण्यात आली असून, नव्या दरांमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित बिघडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. 15 मे रोजी इंधनाच्या दरात मोठी वाढ झाल्यानंतर आता पुन्हा दरवाढ जाहीर करण्यात आली आहे. मंगळवारपासून हे नवे दर लागू झाले असून अनेक शहरांमध्ये पेट्रोलचे दर 107 रुपयांच्या पुढे गेले आहेत.

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमतींमध्ये झालेली वाढ आणि इराण-अमेरिका-इस्रायल संघर्षामुळे निर्माण झालेली अस्थिर परिस्थिती याचा थेट परिणाम भारतातील इंधन दरांवर होत असल्याचे सांगितले जात आहे. पेट्रोलियम कंपन्यांवर वाढत्या खर्चाचा ताण येत असल्याने इंधन दर वाढवण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे समजते.

देशाची राजधानी दिल्लीत पेट्रोलच्या दरात 87 पैशांची वाढ झाली असून आता प्रतिलिटर पेट्रोल 107 रुपयांच्या पुढे पोहोचले आहे. डिझेलच्या दरातही 91 पैशांची वाढ झाली आहे. मुंबईत पेट्रोल 107.59 रुपये तर डिझेल 94.08 रुपयांवर गेले आहे. कोलकाता आणि चेन्नईमध्येही दरवाढीचा परिणाम स्पष्ट दिसून येत आहे.

महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये इंधनाचे दर आणखी वाढले आहेत. नागपुरात पेट्रोलचा दर 108.06 रुपये तर डिझेल 94.63 रुपये इतका झाला आहे. पुण्यात पेट्रोल 107.86 रुपये असून डिझेल 94.40 रुपयांवर पोहोचले आहे. नाशिकमध्ये पेट्रोल 108.84 रुपये आणि डिझेल 95.35 रुपये इतके झाले आहे. रत्नागिरीमध्ये तर पेट्रोलचा दर 109 रुपयांच्या पुढे गेला असून डिझेलही 96 रुपयांच्या आसपास पोहोचले आहे.

दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता असून त्याचा परिणाम भाजीपाला, अन्नधान्य आणि इतर जीवनावश्यक वस्तूंच्या किंमतींवरही होऊ शकतो. त्यामुळे आधीच महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांची चिंता आणखी वाढली आहे. खासगी वाहनधारकांबरोबरच ट्रान्सपोर्ट व्यवसायिकांनाही या दरवाढीचा मोठा फटका बसणार आहे.

आगामी काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारातील परिस्थिती आणखी बिघडल्यास इंधन दरांमध्ये पुन्हा वाढ होण्याची शक्यता तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे लक्ष आता सरकारच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.

महाराष्ट्रातील काही शहरांतील नवे दर

  • पुणे: पेट्रोल 107.86, डिझेल 94.40

  • मुंबई : पेट्रोल 107.59, डिझेल 94.08

  • नाशिक: पेट्रोल 108.84, डिझेल 95.35

  • सोलापूर: पेट्रोल 108.21, डिझेल 94.75 

  • कोल्हापूर: पेट्रोल 108.37, डिझेल 94.93

  • रत्नागिरी: पेट्रोल 109.53, डिझेल 96.06

  • परभणी: पेट्रोल 109.49, डिझेल 95.96

  • नागपूर: पेट्रोल 108.06, डिझेल 94.63

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number