जय महाराष्ट्र न्यूज, यवतमाळ
आत्महत्येचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळमध्ये शेतकऱ्यांचे किटकनाशकांमुळे बळी जाऊ लागले आहेत.
पिकावर बोडअळी ,गुलाबी बोडअळी, मलीबगचा प्रचंड हल्ला रोखण्यासाठी प्रोफेक्स सुपर वा पोलो यासारख्या अतिविषारी कीटकनाशकाची फवारणी केली जाते.
हीच फवारणी शेतकऱ्यांच्या जीवावर बेतली आहे. यामध्ये 18 शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. चौघांनी आपली दृष्टी गमावली आहे. तर 600 हून अधिक शेतकऱ्यांना या किटकनाशकाची बाधा झाली आहे. नेहमीचे काम म्हणून मात्र, तोंडावर काहीही बांधलेलं नव्हतं.
कहर म्हणजे रुग्णालयात उपचार मिळत नसल्याने एका शेतकऱ्याने त्रासातून आत्महत्या करण्याचाही प्रयत्न केला. या सर्व घटनेनंतर सरकारकडून प्रत्येकी ३ लाख रुपये नुकसान भरपाई देणार असल्याचं जाहीर करण्यात आले आहे.
या घटनेनंतर पालकमंत्री मदन येलावार, महसूल राज्य़मंत्री संजय राठोड, शेतकरी स्वावलंबन मिशनचे अध्यक्ष किशोर तिवारी यांच्यात तातडीची बैठक झाली.
ही अतिविषारी कीटकनाशकं चौकशी करुन तात्काळ थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आजवर हीच कीटकनाशके प्राशन करून हजारो शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या.
मात्र, ज्यांनी प्रतिकूल परिस्थितीत जगण्याची उमेद बाळगली आहे, त्यांचा त्यामुळेच मृत्यू. हे पुरोगामी महाराष्ट्रातलं भयाण वास्तवच म्हणावं लागेल.