जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई
मंगळवारी पडलेल्या मुसळधार पावसामुळे सामान्यांचे खूप हाल झाले आहेत. ठाणे आणि मुंबईत धो धो कोसळणाऱ्या पावसाने आतापर्यंत 9 जणांचा बळी घेतला आहे. विक्रोळी सूर्यानगर
पार्कसाईटमध्ये घर कोसळून 2 जणांचा मृत्यू झाला असून, 2 वर्षांच्या एका चिमुकलीचा समावेश आहे.
ठाण्यात मुसळधार पावसामुळे कळव्यातील स्टेशन परिसरालगत असणाऱ्या शांतीनगर ते शिवाजीनगर पादचारी पुलावर मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्यामुळे नाले तुडूंब वाहत होते.
याठिकाणी एक पुरुष, महिला आणि एक मुलगा पाण्याच्या प्रवाहात वाहत जात असताना एका स्थानिक नागरिकाने लहान मुलाला वाचवले मात्र महिलेचा गटारात बुडाल्याने मृत्यू झाला
असून अज्ञात पुरुषाचा मृतदेह हाती लागला नाही. बचावलेल्या मुलाला कळवा रुग्णालयात दाखल केले आहे.
तर तिसऱ्या घटनेमध्ये पावसाच्या जोरामुळे घाटकोपरच्या असल्फा भागात रिलायन्स सबस्टेनशची भिंत घरावर कोसळली. या दुर्घटनेत रामेश्वर
तिवारी यांचा मृत्यू झाला तर त्यांचा मुलगा कृष्णा तिवारी आणि पत्नी मंजू तिवारी जखमी झाले असून त्यांच्यावर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरु आहे.