मुंबईत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला आहे. या मेळाव्यात बोलताना शरद पवार बोलत होते. यावेळी पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली. नुकत्याच महाराष्ट्र भूषण पुरस्कारावेळी खारघर येथे उष्माघाताने मृत्यू झालेल्या दुर्घटनेला पवार यांनी राज्य सरकार निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचे म्हटले असून या दुर्घटनेची न्यायालयीन चौकशी व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.
महाराष्ट्र भूषण प्रदान सोहळा 16 एप्रिल दिवशी संपन्न झाला. या सोहळ्याला लाखोंची गर्दी जमली होती. दरम्यान 12 श्रीसेवकांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याने या सोहळ्याला गालबोट लागलं आहे. विविध राजकीय पक्षांकडून त्यावर प्रतिक्रिया समोर येत असताना आज या दुर्घटनेबाबत बोलताना आज शरद पवार यांनी या दुर्घटनेत निष्पाप बळी गेले आहेत. त्यांच्या मृत्यूला शिंदे-फडणवीस सरकार जबाबदार आहे.
दिवसा कडक उन्हात लोकांची गर्दी जमवून आपल्याला अनुकूल वातावरण करण्याचा डाव शिंदे-फडणवीस सरकारचा असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे. सोबतच या घटनेची चौकशी निवृत्त न्यायाधीशांकडून करावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे. ” खारघर मधील दुर्घटनेची चौकशी आता अधिकाऱ्याच्या समितीकडून करण्यात येत आहे. अधिकारी कितीही प्रामाणिक असला तरी तो राज्य सरकारच्या विरोधात अहवाल देणार नाही. त्यामुळे खारघर घटनेची सत्यता लोकांसमोर येणार नाही. सत्य बाहेर येण्यासाठी या घटनेची चौकशी ही निवृत्त न्यायाधीशांकडून करण्यात यावी.” असं शरद पवार म्हणाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, खारघर दुर्घटना बाबत एकसदस्यीय समिती नेमण्यात आली आहे. त्यांच्याकडून अहवाल मागवण्यात आला आहे. दरम्यान लाईट्स अँड शेड्स इव्हेंट या कंपनीला सरकारने महाराष्ट्र भूषण सोहळ्याचे काम दिले होते. आता विरोधकांनी सदोष मनुष्यवधाच्या आरोपासह कंपनीचे मुख्यमंत्र्यांशी लागेबांधे आहेत का? याची विचारणा केली आहे.