महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठे बदल होत आहेत. छगन भुजबळ आणि अजित पवार हे दोघेही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्ययमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत गेल्यापासून सुप्रिया सुळे, शरद पवार तसेच उद्धव ठाकरे हे येत्या निवडणुकांसाठी कामाला लागलेले दिसतात. शरद पवारांच्या येवल्यातील सभेनंतर ते ॲक्शन मोडमध्ये आले आहेत.
अजित पवार गटाला शह देण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार हे आता नवी रणनीती आखताना दिसत आहेत. नाशिकच्या घडामोडींवर ‘सिल्व्हर ओक’ वरून नजर ठेवली जात आहे. शरद पवार आणि सुप्रिया सुळे नाशिकमध्ये होणाऱ्या सर्व घडामोडींवर मुंबईतून लक्ष ठेवत असल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे. शरद पवारांना महाराष्ट्राच्या राजकारणातील अनुभवी व्यक्तिमत्व म्हणून पाहिलं जातं. छगन भुजबळ यांच्या बालेकिल्यातूनच त्यांनी त्यांच्या पहिल्या सभेची सुरुवात केली.
शरद पवारांसोबतच्या नाशिकमधील कार्यकर्त्यांना मुंबईला बोलावून त्यांच्याकडून नाशिकचा आढावा घेतला जात असल्याची सूत्रांची माहिती आहे. नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची नव्याने पक्षबांधणी होणार असल्याचेही समजत आहे. छगन भुजबळ आणि अजित पवार गटाला शह देण्यासाठी विधानसभा मतदार संघ निहाय आढावा घेतला जात आहे. नाशिकमध्ये ताई गटाकडून लवकरच नव्या नियुक्त्या होणार असल्याचेही समजत आहे.