दिल्ली, ६ जुलै २०२३, प्रतिनिधी: राष्ट्रवादीतील फुटीनंतर दिल्लीत गुरुवारी राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक पार पडली. या बैठकीत अजित पवारांसह ११ नेत्यांची पक्षातून हक्कालपट्टी करण्यात आली आहे. तर संपूर्ण अधिकार शरद पवारांनाच असतील असा विश्वास पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादीतील फुटीनंतर पवार-गांधी भेट
त्याबैठकीनंतर कॉंग्रेस नेते राहुल गांधी हे शरद पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या निवासस्थानावर पोहोचले. यावेळी राष्ट्रीय कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील यासह दिल्लीतील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.
राहुल गांधी आणि शरद पवार यांच्या भेटीत अनेक मुद्द्यांवर चर्चा झाली. येत्या निवडणूकात व राज्यातील राजकारणाविषयी चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. तर संघटितपणे लढा देण्याची भूमिका दोन्ही नेत्यांनी घेतली.
बैठकीत काय म्हणाले पवार
पक्षावर कोणीही दावा करू द्या, कोणीही काहीही बोलत असेल त्याला काही तथ्य नाही, आज दिल्लीत झालेल्या बैठकीत ११ जणांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. आम्हाला निवडणूक आयोगाकडून न्याय मिळेल. राष्ट्रवादीचा मी एकमेव अध्यक्ष आहे. त्यामुळे आम्हाला आयोग आम्हाला योग्य तो न्याय मिळेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. जर तसे झाले नाही तर आम्ही आयोगाव्यतिरिक्त अन्य संस्थांकडून जाऊ, असे बोलत पवारांनी आपल न्यायालयातही जाऊ शकतो, असे संकेत दिले आहेत.