मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. राज ठाकरे यांना बीडमधील परळी न्यायालयाकडून अजामीन वॉरंट जारी करण्यात आले आहे. मराठी पाट्या संदर्भातील मुद्द्यावरून राज ठाकरेंना सांगलीनंतर परळी न्यायालयाकडून अजामीन वॉरंट जारी करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या अडचणीत वोढ होण्याची शक्यता आहे.
राज ठाकरेंना जामीन घेतल्यानंतर न्यायालयात चौकशीसाठी गैरहजर राहिल्यामुळे न्यायालयाने हा आदेश दिला आहे. यापूर्वी १० फेब्रुवारी रोजी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट काढलं होतं तसेच १३ एप्रिलपर्यंत न्यायालयात हजार राहण्यास सांगितले होते. मात्र, राज ठाकरे न्यायालयात हजर न राहिल्यामुळे परळी न्यायालयाने दुसऱ्यांदा राज ठाकरे यांना अजामीन वॉरंट जारी केला आहे.
मुंबईत ऑक्टोबर २००८मध्ये राज ठाकरे यांना अटक करण्यात आली होती. त्यामुळे राज्यभरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून दगडफेक करण्यात आली. परळीमध्येही तणावग्रस्त परिस्थिती उद्भवली होती. त्यामुळे राज ठाकरे यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. मात्र, याप्रकरणी राज ठाकरे आणि मनसे कार्यकर्त्यांना जामीन मंजूर झाला होता. तसेच राज ठाकरे यांना न्यायालयात चौकशीसाठी हजार राहण्यास सांगितले होते. पण राज ठाकरे न्यायालयात अनेकदा गैरहजर राहिले. त्यामुळे परळी न्यायालयाकडून राज ठाकरे यांना अजामीन वॉरंट जारी करण्यात आला आहे.