मागील दहा दिवसांपासून वाहतुकीसाठी बंद असलेला परशुराम घाट गुरुवार पासून वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. तसे आदेश जिल्हाधिकारी रत्नागिरी यांच्यामार्फत जारी करण्यात आले आहेत . मुसळधार पावसामुळे परशुराम घाटात सतत कोसळणाऱ्या दरडीचं प्रमाण लक्षात घेऊन सुरक्षिततेच्या दृष्टीने घाटातील वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. मात्र वाहन चालकांच्या आक्रमकपणामुळे आज प्रशासनाने परशुराम घाट सकाळी६ ते सायंकाळी ७ या वेळेत खुला करण्यात आला आहे. मागील काही दिवसांमध्ये मुंबई गोवा महामार्गावर ट्रक चालकांनी चक्का जाम आंदोलन केले होते, अनेक दिवसांपासून महामार्गावर रखडलेल्या अवजड वाहनांमुळे चालकांचा उद्रेक झाला होता. खाण्यापिण्याच्या व्यवस्था नाहीत, व्यावसायिक नुकसान होत असल्यामुळे ट्रक चालक संतापले होते .पर्यायी मार्गाने देखील अवजड वाहने सोडत नसल्यामुळे चालकांचे नुकसान होत असलयाचे वाहन चालकांचे म्हणे होते, यातच संतापलेल्या ट्रकचालकांनी चिरणी आंबडस रस्ता ट्रक आडवा लावून ब्लॉक केला होता.ट्र्क चालकांनी चक्का जाम आंदोलन केल्याने प्रशासनाकडून परशुराम घाट एक तासासाठी चालू करण्यात आला होता मात्र आता प्रशासनाने वाहन चालकांसाठी पुन्हा एकदा परशुराम घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे.
का झाला होता परशुराम घाट बंद
मुसळधार पावसामुळे परशुराम घाटातील दरड खाली कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.हा घाट वाहतुकीसाठी धोकादायक स्थितीत असल्याने प्रशासनाने योग्य ती खबदारी घेतली असून हा घाट बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.या आधी ०२ जुलै २०२२ रोजी परशुराम घाटामध्ये दरड कोसळल्यामुळे घाट रस्ता बंद झाला होता. पहाटे साडेतीनच्या सुमारास दरड बाजूला करुन पुन्हा वाहतूक सुरु करण्यात आली होती. त्यानंतर दरड खाली येण्याचे प्रमाण वाढतचं राहिले. दरड कोसळण्याबरोबरच परशुराम घाटात अपघाताचे प्रमाण वाढत आहे.