पनवेल/कर्जत: मुंबई, नवी मुंबई आणि रायगडमधील रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. पनवेल-कर्जत नव्या उपनगरीय रेल्वे कॉरिडॉरचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून, हा मार्ग वर्षअखेरपर्यंत सेवेत येण्याच्या दिशेने हालचाली सुरू आहेत. मुंबई रेल्वे विकास महामंडळाकडून या मार्गिकेचे काम जवळपास पूर्ण झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे.
कर्जत ते CSMT प्रवासासाठी नवा पर्याय
सध्या कर्जत परिसरातून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या प्रवाशांसाठी उपलब्ध असलेल्या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक असते. अशा परिस्थितीत पनवेल-कर्जत कॉरिडॉर सुरू झाल्यानंतर कर्जत ते CSMT व्हाया पनवेल असा पर्यायी रेल्वे मार्ग उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, सध्याच्या मुख्य उपनगरीय मार्गावर तांत्रिक बिघाड किंवा अन्य कारणामुळे वाहतूक विस्कळीत झाली, तर या नव्या कॉरिडॉरचा पर्यायी मार्ग म्हणून उपयोग होऊ शकतो. त्यामुळे मध्य रेल्वेच्या विद्यमान नेटवर्कवरील ताण कमी होण्यासही मदत होण्याची अपेक्षा आहे.
29.6 किलोमीटरचा दुहेरी मार्ग
पनवेल-कर्जत उपनगरीय कॉरिडॉरची लांबी सुमारे 29.6 किलोमीटर आहे. यापूर्वी या मार्गावरून मालगाड्या तसेच काही लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक होत होती. आता या मार्गाचे दुहेरीकरण करून स्वतंत्र उपनगरीय वाहतुकीसाठी पायाभूत सुविधा उभारण्यात येत आहेत. MUTP-III अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पासाठी सुमारे 2,782 कोटी रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला आहे. प्रकल्पातील बहुतांश भौतिक काम पूर्ण झाले असून, उर्वरित कामे वेगाने सुरू आहेत.
पनवेल ते कर्जत कनेक्टिव्हिटी होणार मजबूत
नवा रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर पनवेल, कर्जत, नवी मुंबई तसेच रायगड परिसरातील प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. या भागातील वाढत्या नागरीकरणाच्या पार्श्वभूमीवर उपनगरीय रेल्वे कनेक्टिव्हिटी मजबूत होण्याची अपेक्षा आहे. प्रकल्पासाठी आवश्यक जमीन संपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. चिखले आणि मोहापे येथील सबवेचे काम पूर्ण झाले असून काही रोड ओव्हर ब्रिजही वाहतुकीसाठी खुले करण्यात आले आहेत.
विद्युतीकरणाचे कामही वेगात
रेल्वे मार्गाच्या विद्युतीकरणाचे काम सध्या सुरू आहे. काही भागांमध्ये ओव्हरहेड इलेक्ट्रिकल उपकरणे बसवण्याचे काम पूर्ण झाले असून संपर्क तारांसह इतर तांत्रिक कामेही टप्प्याटप्प्याने केली जात आहेत. आता या मार्गिकेची कमिशनर ऑफ रेल्वे सेफ्टीकडून तपासणी होणार आहे. सुरक्षा तपासणी आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा होईल. त्यामुळे कर्जत आणि रायगड परिसरातील प्रवाशांचे मुंबईशी रेल्वे कनेक्टिव्हिटीचे चित्र आगामी काळात मोठ्या प्रमाणात बदलण्याची शक्यता आहे.