यूपीएससीमध्ये यश मिळवणाऱ्या अक्षय मुंडेचा परळीत सत्कार

बीडच्या पांगरीतील डॉ. अक्षय मुंडे याने प्रतिकूल परिस्थितीत शिक्षण घेत UPSC परीक्षा उत्तीर्ण केली. गावकऱ्यांनी जल्लोषात स्वागत करत गौरव केला.

यूपीएससीमध्ये यश मिळवणाऱ्या अक्षय मुंडेचा परळीत सत्कार

बीड: बीड जिल्ह्यामधील परळी तालुक्यातील पांगरी गावचा सुपुत्र डॉ. अक्षय संभाजीराव मुंडे याने केंद्रीय लोकसेवा आयोग (UPSC) परीक्षेत 699वा क्रमांक मिळवत यश मिळवले. त्याच्या या यशाचा गौरव करत गावकऱ्यांनी त्याचा भव्य सत्कार केला. अक्षयने सर्वप्रथम गोपीनाथ गडावर जाऊन स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि त्यानंतर पांगरी गावात ढोल-ताशांच्या गजरात मिरवणुकीतून त्याचे जल्लोषात स्वागत करण्यात आले.

अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही अक्षयनेआपले शिक्षण पूर्ण केले. आई इंदुबाई मुंडे या शेतात राबत असताना अक्षयच्या शिक्षणाची जबाबदारी एकहाती सांभाळत होत्या. आई आजही शेतात काम करते. स्वतः निरक्षर असूनही तिने मला घडवलं. माझ्या यशामागे तिचा मोठा वाटा आहे, असे भावूक शब्दात अक्षयने त्याच्या भावना मांडल्या. त्याच्या बहिणीचा सुद्धा यामध्ये मोलाचा वाटा असल्याचे सांगितले.

अक्षयचे प्राथमिक शिक्षण संत भगवान बाबा विद्यालय, पांगरी येथे झाले. अकरावी-बारावी परळीच्या न्यू हायस्कूल ज्युनिअर कॉलेजमध्ये, तर बीडीएसचे शिक्षण लातूरमधील एमआयटी कॉलेजमध्ये झाले. स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी त्याने सुरुवातीला पुण्यात काही काळ क्लास लावले. मात्र आर्थिक अडचणींमुळे दिल्लीत स्वखर्चाने आणि स्वअभ्यासाने त्याने ही तयारी पूर्ण केली. सहा वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर सहाव्या प्रयत्नात त्याने हे यश मिळवले.

हेही वाचा:उच्च न्यायालयाचा स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला मोठा दिलासा

अक्षयच्या घरी परिस्थिती खूपच हलाखीची होती. कोचिंगसाठी पैसे नव्हते, त्यामुळे त्याने स्वतः अभ्यास करत परीक्षेची तयारी केली. आईने व्याजाने पैसे घेऊन माझं शिक्षण सुरू ठेवलं, आज माझ्या नावावर कर्जही आहे. पण मी हार मानली नाही. प्रयत्न करत राहिलो, कारण देव आहे हे स्वतःला सतत सांगत होतो, असे त्याने सांगितले. तुकाराम मुंढे आणि किरण कुमार गित्ते हे अधिकारी त्यांच्या प्रेरणास्थान आहेत, असेही त्याने  म्हटले आहे.

अक्षय मुंडे याच्या या यशामुळे पांगरीसह संपूर्ण परळी तालुक्यात आनंदाचे वातावरण आहे. गावकरी, मित्रमंडळी, आणि स्थानिकांनी मोठ्या उत्साहात त्याचे स्वागत केले. जेसीबीतून फुलांची उधळण, औक्षण आणि ढोल-ताशांच्या गजरात निघालेली मिरवणूक हे दृश्य खूपच भारावून टाकणारे होते.

मी करू शकलो, तर अनेक अक्षयही हे करू शकतात. पण त्यासाठी कष्ट घेण्याची तयारी हवी, असा संदेश त्याने तरुणांना दिला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number