पंढरपूरातील श्री विठ्ठल आणि श्री रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी तसेच विविध पूजांमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या भाविकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. मंदिर समितीने 4 ऑगस्ट ते 31 डिसेंबर 2026 या कालावधीत होणाऱ्या विविध पूजांसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू करण्याची घोषणा केली आहे. ही नोंदणी 3 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजल्यापासून सुरू होणार असल्याची माहिती मंदिर समितीचे व्यवस्थापक प्रवीणकुमार घम यांनी दिली.
मंदिर समितीच्या या उपक्रमामुळे राज्यासह देशभरातील आणि परदेशातील भाविकांना घरबसल्या पूजांची नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे पंढरपूरला प्रत्यक्ष येऊन नोंदणी करण्याची गरज भासणार नाही. ऑनलाइन प्रक्रियेमुळे भाविकांचा वेळ वाचणार असून पूजांचे नियोजनही अधिक सुलभ होणार आहे.
या नोंदणी प्रक्रियेत श्री विठ्ठल नित्यपूजा, श्री रुक्मिणी माता नित्यपूजा, पाद्यपूजा, तुळशी अर्चन पूजा आणि महानैवेद्य सहभाग योजनेचा समावेश करण्यात आला आहे. मंदिर प्रशासनाने पूजांसाठी निश्चित देणगी मूल्यही जाहीर केले आहे.
पूजांसाठी देणगी दर पुढीलप्रमाणे आहेत :
श्री विठ्ठल नित्यपूजा – 25,000 रुपये
श्री रुक्मिणी माता नित्यपूजा – 11,000 रुपये
पाद्यपूजा – 5,000 रुपये
तुळशी अर्चन पूजा – 2,100 रुपये
महानैवेद्य सहभाग योजना – 7,000 रुपये
मंदिर समितीने भाविकांना अधिकृत ऑनलाइन पोर्टलवरूनच नोंदणी करण्याचे आवाहन केले आहे. नोंदणी करताना आवश्यक माहिती अचूक भरावी आणि पूजेची तारीख उपलब्धतेनुसार निवडावी, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरवर्षी हजारो भाविक श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या पूजांमध्ये सहभागी होण्यासाठी उत्सुक असतात. त्यामुळे ऑनलाइन नोंदणी सुरू झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. इच्छुक भाविकांनी वेळेत नोंदणी करून आपल्या पसंतीच्या तारखेसाठी पूजेचे आरक्षण निश्चित करून घ्यावे, असे आवाहन मंदिर प्रशासनाकडून करण्यात आले आहे.