पंढरपूर: श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी पंढरपूरात येणाऱ्या लाखो भाविकांसाठी राज्य सरकारकडून एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. तिरुपतीच्या धर्तीवर अत्याधुनिक दर्शन मंडप उभारला जाणार असून त्यासाठी तब्बल 130 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या मंडपामुळे भाविकांना कमी वेळेत, तसेच अधिक सोयीस्कर पद्धतीने विठ्ठल-रुक्मिणीचे दर्शन घेता येईल. या कामाचे कार्यारंभ आदेश आधीच देण्यात आले असून प्रशासनाला हे काम जलदगतीने पूर्ण करण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. त्यांनी सांगितले की, “पंढरपूरातील दर्शन रांगांमध्ये भाविकांना पिण्याचे पाणी, सावली, बैठक व्यवस्था यांसह सर्व मूलभूत सुविधा उपलब्ध होतील. हे काम भाविकांच्या श्रद्धा आणि सोयीचा विचार करून तातडीने पूर्ण व्हावे.”
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मानाचे वारकरी रामराव वालेगावकर यांच्या हस्ते कार्तिकी वारी 2025 निमित्त श्री विठ्ठल-रुक्मिणीची शासकीय महापूजा सपत्नीक पार पडली. या वेळी मंदिर समितीच्या वतीने झालेल्या सत्कार समारंभात शिंदे बोलत होते. या कार्यक्रमाला पालकमंत्री जयकुमार गोरे, फलोत्पादन मंत्री भरत गोगावले आणि खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. शिंदे म्हणाले, “दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी वारीदरम्यान पंढरपूरात लाखो वारकरी आणि भाविक दर्शनासाठी येतात. गर्दीच्या काळात दर्शनासाठी तासन्तास उभं राहावं लागू नये, म्हणून या मंडपाचं काम वेळेत पूर्ण करणं अत्यावश्यक आहे. भाविकांना त्रास होऊ नये यासाठी प्रशासनाने विशेष काळजी घ्यावी.”
त्याचबरोबर उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की, “पंढरपूरात आता व्हीआयपी दर्शन बंद करण्यात आलं आहे, कारण खरा व्हीआयपी म्हणजे वारकरीच. त्यामुळे सर्व भक्तांना समान संधी मिळावी आणि कोणाच्याही भावनांचा अनादर होऊ नये, यासाठी सरकार व प्रशासन एकत्र काम करत आहेत.” महापूजनंतर एकनाथ शिंदे यांनी काही तातडीचे निर्णयही जाहीर केले. त्यांनी सांगितले, “पंढरपूर शहरातील रस्त्यांवरील खड्डे बुजवण्यासाठी 5 कोटी रुपयांचा निधी तात्काळ मंजूर केला आहे. तसेच मंदिर समितीच्या पर्यटक निवास जागेचा करार 30 वर्षांसाठी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.”
या निर्णयामुळे भाविकांना राहण्यासाठी अधिक सोयीस्कर सुविधा उपलब्ध होतील. शिंदे यांनी पुढे सांगितलं की, “चंद्रभागा नदी स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त करण्यासाठी प्रशासनाने विशेष मोहिम सुरू केली आहे. वारकऱ्यांची ही मागणी लवकर पूर्ण होईल. पंढरपूरच्या विकासासाठी आवश्यक असलेल्या सर्व योजना प्राधान्याने राबवल्या जातील.” या सर्व उपक्रमांमुळे पंढरपूरात येणाऱ्या भाविकांना आता सुविधायुक्त, सुरक्षित आणि सुखद दर्शनाचा अनुभव मिळणार आहे. तिरुपतीच्या धर्तीवर होणारा हा नवीन दर्शन मंडप पंढरपूरच्या धार्मिक आणि पर्यटन विकासासाठी एक ऐतिहासिक पाऊल ठरणार आहे.