देशातील अनेक राज्यांमध्ये मान्सूनने जोरदार दणका दिला आहे. यामुळे अनेक राज्यांमध्ये नागरिकांची तारांबळ उडाली असून काही ठिकाणी नद्यांना पूर आला आहे. यामुळे लोकांची धावपळ उडाली असून काही ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. यादरम्यान हरियाणामधील एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओत एक कार नदीच्या प्रवाहात वाहून जाताना दिसत आहे. यावेळी कारमध्ये असलेल्या महिलेला वाचवण्यात यश आलं आहे.
हरियाणातील पंचकुला येथील खडक मांगोलीजवळ दर्शनासाठी आलेल्या महिलेची कार नदीत वाहून गेली. मिळालेल्या माहितीनुसार, ही महिला तिच्या आईसोबत दर्शनासाठी आली होती. दरम्यान नदीकाठी कार पार्क केली आणि तेवढ्यात पाण्याचा प्रवाह वाढला, त्यामुळे कार नदीत वाहून गेली. गाडीत असणाऱ्या महिलेला पंचकुलाच्या सेक्टर ६ मध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.