जय महाराष्ट्र न्यूज, पालघर
पालघरमधील एका अदिवासी समाजातील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. वडिलांचा मृतदेह घरी असतांना जुळ्या बहिणींनी आपला बारावीचा पेपर देऊन एक नवा आदर्श उभा केलाय. दीपिका चौधरी आणि पूजा चौधरी या जुळया मुलींचे सर्वच स्तरातून कौतुक होतंय. डहाणूतील पुंजावे गावच्या विनोद चौधरी यांचे काल रात्री निधन झाले.

मात्र, बारावीचा आज भूगोलचा शेवटचा पेपर असल्याने त्यांच्या दोन्ही लेकींना पेपर देण्यासाठी जाणे देखील महत्त्वाचे होते. त्यामुळे दोन्ही मूली मृतदेह घरी असताना देखील ठक्कर बाप्पा महाविद्यालयात पेपर देण्यासाठी गेल्या. खरंतर एका बाजूला ग्रामीण भागातील मुली शिक्षणापासून वंचित राहत असताना, शिक्षणाची आवड असणाऱ्या या दोन्ही बहिणींनी समाजाला एक वेगळी दिशा दिलीय.