पुणे, ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : स्वातंत्र्यदिनी महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाकिस्तान झिंदाबाद असे नारे दिल्याच्या घटना घडल्या. पुण्यात कोंढवा, नाशिक जिल्ह्यात चांदवडमध्ये, बुलढाण्यात मलकापूर आणि सातारा शहरात हा प्रकार घडला. भारताच्या स्वातंत्र्यदिनी हे आक्षेपार्ह नारे देणाऱ्यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. या प्रकरणी पुढील कायदेशीर कारवाई सुरू झाली आहे.
सातारा येथे अमर लक्ष्मी स्टॉप येथे राहणाऱ्या तरुणाने महापुरुषांचा अपमान करणारी इन्स्टाग्राम पोस्ट ठेवली होती. या पोस्टमध्ये त्याने आक्षेपार्ह नारा दिला होता. बुलढाण्यात मलकापूरमध्ये राहणाऱ्या तरुणानेही इन्स्टाग्रामवर आक्षेपार्ह नारा दिला होता. पुण्यात कोंढवा येथे शाळेचे बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी दोनजण सुरक्षा रक्षक म्हणून काम करत होते. या दोघांनी आक्षेपार्ह नारे दिले होते. चांदवड टोल नाका येथे एका तरुणाने स्वातंत्र्यदिनाची सजावट सुरू असताना आक्षेपार्ह नारा दिला. या सर्व घटनांप्रकरणी पोलिसांकडे तक्रारी दाखल झाल्या आहेत. पोलिसांनी आक्षेपार्ह नारा देणारे, आक्षेपार्ह इन्स्टा पोस्ट ठेवणारे अशा सर्वांना अटक केली आहे. या प्रकरणांमध्ये पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू आहे.