16 वर्षीय विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; दहावीचा निकाल पाहण्याआधीच काळाने गाठले

ढाकेफळ (पैठण) येथे नव्या घरावर पाणी मारताना विजेचा धक्का बसून 16 वर्षीय साबेर शेख याचा मृत्यू झाला. नुकतीच दहावीची परीक्षा दिलेल्या युवकाच्या मृत्यूनं गावात शोककळा पसरली.

16 वर्षीय विद्यार्थ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू; दहावीचा निकाल पाहण्याआधीच काळाने गाठले

पैठण: पैठण तालुक्यातील ढाकेफळ येथे एक हृदयद्रावक घटना घडली आहे. नव्या घराच्या बांधकामावर पाणी मारताना विजेच्या धक्क्याने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. या अपघातामुळे गावात शोककळा पसरली आहे. मृत युवकाचे नाव साबेर शाकेर शेख असून, तो तुकाराम माध्यमिक विद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेत होता. त्याने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती आणि निकालाच्या प्रतिक्षेत होता.

शनिवारी सकाळी ही घटना घडली. ढाकेफळ येथील शेख कुटुंब आपल्या नवीन घराचे बांधकाम करत असून, साबेर घरावर पाणी मारत होता. याचवेळी पाण्यात विद्युत प्रवाह उतरल्याने त्याला जोराचा विजेचा धक्का बसला. धक्का बसताच तो जमिनीवर कोसळला. कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी तातडीने त्याला खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, मात्र डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले.

हेही वाचा:वर्ध्यातून हिंदुत्वाचा हुंकार! पश्चिम बंगालच्या अन्यायाविरुद्ध जन आक्रोश मोर्चा

साबेरचा आकस्मिक मृत्यू गावासाठी मोठा धक्का ठरला आहे. अभ्यासात हुशार आणि स्वभावाने शांत असलेल्या या विद्यार्थ्याने शिक्षणासाठी मेहनत घेतली होती. त्याचे उज्ज्वल भविष्य उभे राहत असतानाच त्याचे आयुष्य विजेच्या धक्क्याने संपुष्टात आले. या घटनेनंतर शाळेतील शिक्षक, मित्र, तसेच गावकऱ्यांनी मोठ्या दु:खाची भावना व्यक्त केली.

दुपारी साबेरच्या पार्थिवावर विशेष नमाज अदा करून शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. अंत्यविधीला गावातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.

दरम्यान, या घटनेची माहिती प्रशासनाकडे देण्यात आली असून, विजेच्या गळतीचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी महावितरण विभागाने तपास सुरू केला आहे. सुरक्षिततेचे नियम पाळले गेले असते तर हा अपघात टाळता आला असता, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. या अपघातामुळे पुन्हा एकदा ग्रामीण भागात वीज सुरक्षेच्या उपाययोजनांकडे गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित झाली आहे. प्रशासनाने अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी कठोर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number