वृत्तसंस्था, मुंबई
‘पद्मावती’ या सिनेमावर भारतातील काही राज्यांमध्ये बंदी घालण्यात आली असली तरी ब्रिटनमध्ये मात्र ‘पद्मावती’च्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झालाय.
ब्रिटनच्या सेन्सॉर बोर्डाने कोणतीही काटछाट न सुचवता ‘पद्मावती’च्या प्रदर्शनाला मंजुरी दिलीय. ब्रिटेनच्या सेन्सॉर बोर्डाने मंजुरी दिल्यानंतर आता ब्रिटनमध्ये 12 वर्षाची मुलं आणि त्यापेक्षा जास्त वयाची व्यक्ती हा सिनेमा पाहू शकणारेत.
‘पद्मावती’वरून भारतात वाद होण्यापूर्वीच ब्रिटनच्या सेन्सॉर बोर्डाकडे हा सिनेमा मंजुरीसाठी पाठविण्यात आला होता. नंतर भारतात या सिनेमावरून वादळ निर्माण झालं.
काही संघटनांनी या सिनेमातील काही दृश्यांना आक्षेप घेतल्यानं गुजरात, बिहारसह अनेक राज्यांनी या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घातलीय. मात्र, आता ब्रिटनमध्ये पद्मावती प्रदर्शित होणार, या माहितीनंतर भारतात त्याचे काय पडसाद उमटणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणारंय.