Packaged Food Safety: धक्कादायक! विक्रीस असलेल्या चिक्कीत जिवंत अळ्या; ग्राहकांची संतापाची लाट

या घटनेमुळे शहरात विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणी यंत्रणेवरही टीका केली जात आहे.

Packaged Food Safety: धक्कादायक! विक्रीस असलेल्या चिक्कीत जिवंत अळ्या; ग्राहकांची संतापाची लाट

पॅकबंद खाद्यपदार्थ खरेदी करताना त्याची गुणवत्ता चांगली असेल, अशी प्रत्येक ग्राहकाची अपेक्षा असते. मात्र, अहिल्यानगरमध्ये समोर आलेल्या एका धक्कादायक प्रकाराने अन्नसुरक्षेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. माळीवाडा बसस्थानक परिसरातून विकत घेतलेल्या चिक्कीच्या पॅकेटमध्ये जिवंत अळ्या आढळल्याने ग्राहकांना मोठा धक्का बसला. या घटनेमुळे शहरात विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेबाबत प्रश्न उपस्थित होत असून, अन्न व औषध प्रशासनाच्या तपासणी यंत्रणेवरही टीका केली जात आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, बाबासाहेब आव्हाड यांनी माळीवाडा बसस्थानकाजवळील एका हातगाडीवरून चिक्कीची तीन पॅकेट खरेदी केली होती. घरी जाऊन पॅकेट उघडल्यानंतर त्यामध्ये मोठ्या प्रमाणात जिवंत अळ्या फिरत असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. हा प्रकार पाहून त्यांना धक्का बसला.

यानंतर त्यांनी संबंधित हातगाडी चालकाकडे याबाबत विचारणा केली. त्यावेळी चिक्कीचा साठा माळीवाडा परिसरातील एका किराणा दुकानातून आणल्याचे चालकाने सांगितल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेनंतर शहरात विक्री होणाऱ्या खाद्यपदार्थांच्या दर्जाबाबत नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. मुदतबाह्य, निकृष्ट किंवा दूषित अन्नपदार्थांची विक्री होत असल्याच्या तक्रारी वेळोवेळी समोर येत असतानाही प्रभावी कारवाई होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.विशेषतः अशा प्रकारचे दूषित अन्नपदार्थ लहान मुले, विद्यार्थी आणि सर्वसामान्यांच्या आरोग्यास गंभीर धोका निर्माण करू शकतात. त्यामुळे संबंधित दुकान, पुरवठादार आणि जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी, तसेच शहरातील सर्व खाद्यपदार्थ विक्रेत्यांची विशेष तपासणी मोहीम राबवावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

दरम्यान, आयएएस अधिकारी तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या आयुक्तपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळ आणि निकृष्ट अन्नपदार्थांविरोधात कारवाईचे सत्र सुरू आहे. काही दिवसांपूर्वी आंबेगाव तालुक्यातही एफडीएने दूध भेसळीप्रकरणी धाड टाकून कारवाई केली होती. अशा पार्श्वभूमीवर अहिल्यानगरमधील हा प्रकार समोर आल्याने अन्नसुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number