आज ३ जून हा जागतिक सायकल दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जात आहे. मधली काही वर्षं तरुणाईच्या आयुष्यातून सायकल हद्दपार झाली होती. पण, आता अचानक जबरदस्त वेगानं सायकल अनेकांच्या आयुष्यात परत आली आहे.काहींना तर सायकल ‘रायडिंग’चं वेडच लागले आहे.संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने 3 जून हा जागतिक सायकल दिन म्हणून घोषित करण्याचा निर्णय घेतला.
सायकली दोन शतकांपासून वापरल्या जात आहेत आणि आरोग्याला प्रोत्साहन देणारे एक साधे, परवडणारे, विश्वासार्ह, स्वच्छ आणि पर्यावरणीयदृष्ट्या टिकाऊ साधन आहे.संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने शारीरिक आणि मानसिक आरोग्य बळकट करण्यासाठी राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवर सायकल राइड आयोजित करण्याच्या उपक्रमांचे विधानसभेने स्वागत केले. त्याचबरोबर समाजात सायकल चालवण्याची संस्कृती रुजवणे हादेखील त्यामागचा हेतू आहे.
नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने शुक्रवारी जागतिक सायकल दिनानिमित्त नागपूरात केंद्र सरकारच्या “इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज-२” अंतर्गत पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने ‘सायकल राईड’चे आयोजन करण्यात आले. यावेळी नागपूरच्या जिल्हाधिकारी विमला आर. मनपा आयुक्त राधाकृष्णन बी, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह नागरिक या सायकल रॅलीत सहभागी झाले होते.
दीक्षाभूमी येथून निघालेल्या या सायकल रॅलीला भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांनी हिरवी झेंडा दाखविला . जागतिक सायकल दिनानिमित्त नागरिकांना शुभेच्छा देत सर्वांनी सायकलीचा वापर करावा असे आवाहन केले. यावेळी जिल्हाधिकारी, मनपा आयुक्त यांनीही जनतेला वाहतूक करण्यासाठी नेहमी सायकल चालविण्याचे आवाहन केले. जिल्हा प्रशासनातर्फे साइकल फॉर चेंज चॅलेंज सात दिवस राबवण्यात येणार आहे. दरम्यान महा रेल्वे आणि नेहरू युवा केंद्रातर्फेही नागपूरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीत अनेक अधिकारी, नागरिक सहभागी झाले होते, ही सायकल रॅली रेल्वे स्थानक परिसरातून काढण्यात आली होती.