राज्यात मान्सून लांबण्याची हवामानतज्ज्ञांनी व्यक्त केलेली शक्यता आणि राज्यातील प्रमुख धरणांनी गाठलेला तळ विचारात घेता दमदार पावसाला सुरुवात होईपर्यंत जूनमध्ये काहीकाळ राज्यावर पाणीबाणी ओढविण्याची दाट शक्यता दिसून येत आहे. मॉन्सूनच्या धारा बरसायला विलंब आहे. पावसाळा सुरू व्हायला अजून आठ-पंधरा दिवसांचा कालावधी लागण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
मात्र आजघडीला राज्यातील मोठ्या, मध्यम आणि लहान आकाराच्या धरणामध्ये केवळ 26 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यातही मराठवाड्याच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले उजनी धरण कोरडेठाक पडले आहे, तर महाराष्ट्राची जीवनवाहिनी समजल्या जाणाऱ्या कोयना धरणात फक्त साडेआठ टीएमसी पाणीसाठा शिल्लक आहे. राज्यातील काही प्रमुख चरणांमध्ये तर केवळ एक-दोन टीएमसी एवढाच पाणीसाठा आहे. पुणे विभागात सर्वात कमी म्हणजे केवळ १३.५९ टक्के पाणीसाठा आहे. त्यामुळे जूनच्या मध्यापासून मान्सूनला सुरुवात होईपर्यंत राज्याच्या काही भागात पाणीबाणी ओढविणे शक्य आहे..
नाशिककरांची तहान जागविणाऱ्या गंगापूर धरणात पाणीसाठा २६ टक्केच असून, पावसाने जास्तीच ओढ दिली तर मात्र नाशिककरांवर पाणी कपातीचीही वेळ येऊ शकते. नाशिक शहराला गंगापूर धरणातून पाणीपुरवठा केला जातो. यंदा मॉन्सूनचे आगमन उशिराने होत असल्याचा अंदाज हवामान विभागाने यापूर्वीच व्यक्त केलेला आहे.त्यानुसार, अद्याप मॉन्सून कोकणातही दाखल झालेला नाही. त्यामुळे पाऊस नेहमीपेक्षा आणखी आठवड्याने लांबण्याची चिन्हे आहेत. पाऊस अधिकच लांबला तर मात्र नाशिककरांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागण्याची चिन्हे आहेत.