बळीराजाला एकीकडे कांदा व द्राक्ष कवडीमोल भावाने विक्री करावे लागत असताना दुसरीकडे अस्मानी संकटानेही त्यांना घेरले आहे. सोमवारी पहाटे चारपासून अवकाळी पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांचे कांदा, मका, हरभरा, गहू व द्राक्ष पिकाचे नुकसान झाले आहे. हवामान खात्याने दोन दिवस पावसाची शक्यता वर्तवली होती. लासलगाव परिसरात सोमवारी पहाटे चारपासून पावसास विजांच्या कडकडाटासह सुरुवात झाली.
अनेक ठिकाणी शेतात काढून ठेवलेला कांदा या पावसात भिजला आहे. द्राक्ष हंगाम सुरू असून शेतकऱ्यांना १८ ते २० रुपये प्रति किलोने द्राक्ष विक्री करण्याची वेळ आलेली असताना अवकाळीच्या तडाख्यात द्राक्ष पीक सापडले आहे. शेतातील गहू, हरभरा पीक आडवे झाले आहे. लासलगाव बाजार समितीत व्यापाऱ्यांचा उघड्यावर असलेला कांदा तसेच मका भिजल्याने नुकसान झाले आहे. बाजारपेठेत शेतीमालाला भाव नाही. त्यामुळे सुलतानी संकट व पावसाचे वातावरण नसताना अचानक पाऊस होऊन मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत असल्याने अस्मानी संकट अशा दुहेरी संकटात जिल्ह्यातील बळीराजा सापडला आहे.