मुंबई: राज्यात ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावर राजकीय वातावरण तापलं आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीमध्ये ओबीसी उमेदवार देण्याची घोषणा केली. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी मंत्र्यांवर सणसणीत टीका केली आहे.
भाजप नेते गोपीचंद पडळकर यांनी ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवर यांच्यावर टीका केली आहे. ‘महाविकास आघाडी सरकारमधील ओबीसी नेत्यांचं काका-पुतण्याच्या ताटाखालचं मांजर झालं आहे आणि ओबीसी मंत्र्यांचं माकड झालं आहे. जिथे ओबीसी मंत्र्यांच्याही शब्दाला मातीची किंमत नाहीये, तिथं सर्वसामान्य ओबीसींविषयी या प्रस्थापितांना किती आकस असेल. एकीकडे ओबीसी मंत्री म्हणतात जोपर्यंत ओबीसी आरक्षण पुन्हा प्रस्थापित होणार नाही, तो पर्यंत आम्ही निवडणूक होऊ देणार नाही, पण दुसऱ्याच दिवशी निवडणूका जाहीर होतात. काय किंमत झालीये ओबीसी मंत्र्यांची? तुम्ही काय फक्त प्रस्थापितांना मुजरे घालण्यासाठी मंत्री झालात का? तुम्ही सत्तेसाठी ओबीसींचा आत्मसन्मानही विकला का?’,असे सवाल पडळकर यांनी उपस्थित केले आहेत.
देवेंद्रजी फडणवीसांनी भाजपाच्या सर्वच जागांवर ओबीसी उमेदवार जाहीर करण्याच्या निर्णयाचं अभिनंदन… पण दुसरीकडे महाविकास आघाडी सरकारमधील ओबीसी मंत्री आणि नेते काका-पुतण्याच्या ताटाखालचं मांजर झालेत यांच्या शब्दाला मातीचीही किंमत नाही हे सिद्ध झालंय.. pic.twitter.com/gZgferWySX — Gopichand Padalkar (@GopichandP_MLA) June 24, 2021
‘ओबीसी भटके विमुक्त बहुजन समाजाचा विश्वासघात करून निवडणूका घ्याल तर ओबीसी समाज दणका दिल्याशिवाय गप्प बसणार नाही. ही ओबीसी बहुजनाच्या आक्रोशाची आग महाराष्ट्रभर पेटेल आणि येत्या २६ तारखेला तुम्ही समस्त ओबीसी, भटके, बहुजन, अठरापगड बारा बलुतेदार समाजाची ताकद बघालच’, असंदेखील पडळकर यावेळी म्हणाले.
राज्यातील पाच जिल्हा परिषदा आणि त्यातल्या पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये सर्वच्या सर्व जागांवर फक्त ओबीसी उमेदवारच देण्याचा निर्णय भाजपने घेतला असून त्याबाबतची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. त्याबद्दल गोपीचंद पडळकर यांनी देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले.