गणपती बाप्पांची एखादी मूर्ती जर तुम्हाला आवडली असेल, पण गर्दीत जाऊन बाप्पांची मूर्ती घरी आणायची कशी असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल, तर नाशिकच्या के.के. वाघ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी त्यावर एक अफलातून शक्कल लढवली आहे. Indfest.com नावाची एक वेबसाइट तयार करुन त्यावर नाशिकच्या दुकानांमधील आकर्षक आणि इको फ्रेंडली गणेश मुर्ती डिस्प्ले करण्यात आल्या आहेत.
या गणेश मूर्ती तुम्ही ऑनलाइन बुक केल्यानंतर तुमच्या आवडत्या बाप्पांची फ्री होम डिलिव्हरी तुम्हाला मिळणार आहे. विशेष म्हणजे या वेबसाइटला नाशिककरांनी तुफान प्रतिसाद मिळत आहे. काळानुरूप गणेशोत्सव बदलत चालला आहे. आता तर बाप्पांची मूर्ती घरी आणण्यासाठी तुम्हाला बाजारात गर्दीमध्ये जाण्याची देखील गरज नाही.
वयोवृद्ध भाविक तसंच गर्दीमधून मूर्ती आणणं जाणं टाळायंच असेल तर नाशिकच्या तरुणांनी ही ऑनलाइन गणपती आगमनाची संकल्पना तुम्हाला नक्की उपयोगी पडू शकते. इंजिनिअरींग करणाऱ्या तरुणांनी indfest.com नावाची एक वेबसाइट तयार केली आहे. या वेबसाइटवर नाशिकच्या वेगवेगळ्या दुुकानांमधल्या आकर्षक गणेश मुर्तीचे फोटो काढून, तसंच त्यांची लांबी,रुंदी,उंची, त्यांचा रंग, फेट्याचा रंग, पितांबर अशी संपूर्ण माहिती देण्यात आली आहे.
इंडफेस्टच्या14 जणांच्या टीममध्ये मुलींचादेखील समावेश आहे. अभ्यास करता करता समाजसेवा करता यावी, तसंच हिंदु सण हायटेक होऊन सर्वांनाच त्या सणांचा आनंद घेता यावा, यासाठी ही संकल्पना राबवल्याचं टीममधल्या तरुणींनी सांगितलं आहे.
या वेबसाइटवर वेगवेगळ्या कॅटॅगरीज करण्यात आल्या आहेत. यात शाडुच्या मुर्ती, लालबाग राजा, बाल गणेश, दगडुशेठ गणपती, लोडवर टेकलेले बाप्पा, दागिने घातलेले बाप्पा अशा अनेक मूर्ती आहेत. यासोबतच इको फ्रेंडली डेकोरेशनचं सामान आणि पुजा साहित्य देखील उपलब्ध असणार आहे.
विशेष म्हणजे कॅश ऑन डिलेव्हरी आणि PAYTM ची सोय देखील ठेवण्यात आल्यानं नाशिककरांनी या वेबसाइटला प्रचंड प्रतिसाद दिला आहे.