मुंबई , ८ जुलै २०२३, प्रतिनिधी :, राज्यातील सत्तासंघर्षाबाबत मोठी बातमी समोर आली आहे. निवडणूक आयोगानं शिवसेनेच्या घटनेची प्रत विधानसभा अध्यक्षांना पाठवताच राहुल नार्वेकर हे अॅक्शन मोडमध्ये आले आहेत. अपात्रतेसंदर्भांत शिवसेनेच्या ४० आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या १४ आमदारांना राहुल नार्वेकरांकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. दोन्ही गटाच्या आमदारांना आपली बाजू मांडण्यासाठी ७ दिवसांचा वेळ देण्यात आला आहे.
सर्वोच्च न्यायालयात आमदार अपात्रतेबाबतचा हा निर्णय प्रलंबित होता. वर्षभराच्या न्यायालयीन लढाईनंतर ११ मे रोजी याबाबत निकाल देत न्यायालयाने याबाबतचा निर्णय विधानसभा अध्यक्षांनी घ्यावा, असा निर्णय दिला. शिवसेनेच्या १६ आमदारांच्या अपात्रतेबाबत शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सुनील प्रभू यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.
महाराष्ट्र विधानसभा अध्यक्षांना आमदारांच्या अपात्रतेबाबत निर्णय घ्यायला सांगा या आशयाची याचिका सुनील प्रभूंकडून दाखल करण्यात येत आहे.सुनील प्रभूंच्या या याचिकेवर आता सर्वोच्च न्यायालयाची भूमिका काय असणार? याकडे लक्ष लागलेले असतानाच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही गटाच्या आमदारांना नोटीस बजावली आहे. दोन्ही गटाच्या आमदारांना सात दिवसांचा वेळ देण्यात आला आहे.
दरम्यान, आमदार अपात्रेबाबत न्यायालयाने सर्व अधिकार विधानसभा अध्यक्षांकडे दिले आहेत. मात्र, अध्यक्षांकडून याबाबत कोणतीही कार्यवाही करण्यात आली नसल्याने हा निर्णय आणखी लांबणीवर जाऊ शकतो. महाराष्ट्रात राजकीय परिस्थिती पाहता, अपात्रतेच्या मुद्द्यावर अध्यक्षांनी लवकरात लवकर निर्णय घ्यावा. अध्यक्षांना तशा पद्धतीचे निर्देश देण्यात यावेत, अशा आशयाची याचिका शिवसेना ठाकरे गटाकडून दाखल करण्यात आली आहे.