संपात सहभागी असलेल्या जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. आरोग्य यंत्रणेवर परिणाम होत असल्याने आदेश जारी केला. कामावर हजर व्हा, नाही तर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल. त्यामुळे रोज १२ कोटी रूपये याप्रमाणे तीन दिवसांचे ३६ कोटींचे वेतन कपात होण्याची शक्यता आहे. गेल्या ३ दिवसांपासून राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. जुनी पेन्शन योजनेसाठी सरकारी कर्मचारी संपात सहभागी आहे.
१४ मार्चपासून राज्यासह सर्व प्रशासकीय विभागातील २००५ नंतर शासकीय सेवेत आलेल्या कर्मचाऱ्यांंनी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी बेमुदत संपाची हाक दिली असून संपाचा गुरुवारी तिसरा दिवस होता. मार्च महिन्यातच संप पुकारल्यामुळे महसूल कामकाजासह सर्व अंगीकृत कामांवर संपाचा परिणाम झाला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४८ विभागांतील २३,६२२ पैकी ८,७२२ कर्मचारी संपात सहभागी आहेत. १४,५९६ कर्मचारी कामावर हजर असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, बीड, धाराशिव, लातूरमधील महापालिका वगळून सुमारे ८० हजार शासकीय कर्मचारी संपात सहभागी असल्याने सगळ्याच कामकाजावर परिणाम झाला.
‘एकच मिशन – जुनी पेन्शन’ हा नारा देत मराठवाड्यासह राज्यातील शासकीय कर्मचारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच आरोग्य आणि बांधकाम विभागातील कर्मचाऱ्यांनी १४ मार्चपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसले आहे. त्यांंना बजावलेल्या नोटीसमध्ये शिस्तभंग, गैरवर्तणुकीसह काम नाहीतर वेतन नाही, या धोरणाचा उल्लेख देखील करण्यात आला आहे.