एसटी कर्मचाऱ्यांचे वकील ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्याबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. ऍड. गुणरत्न सदावर्ते यांच्या घरात नोटा मोजायचे यंत्र सापडले असल्याचा दावा सरकारी वकील प्रदीप घरत यांनी केला आहे. तसेच या मशिनीद्वारे त्यांनी ८५ लाख रुपये सदावर्तेंनी मोजले असल्याची माहिती प्रदीप घरत यांनी गिरगाव न्यायालयात युक्तीवाद करताना दिली.
सरकारी वकील प्रदीप घरत यांनी युक्तीवाद करताना गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. सदावर्तेंच्या घरात नोटा मोजायचे यंत्र सापडले असल्याचे प्रदीप घरत यांनी सांगितले आहे. तसेच सदावर्तेंनी एसटी कर्मचाऱ्यांकडून गोळा केलेल्या पैशांतून मालमत्ता खरेदी केली असल्याचेही घरत यांनी सांगितले आहे. सदावर्तेंच्या घरातून संशयस्पद कागदपत्र आणि साहित्य जप्त करण्यात आले आहे. त्यामुळे या सर्वांची चौकशी करणे गरजेचे असल्याचे प्रदीप घरत यांनी युक्तीवाद करताना न्यायालयात सांगितले आहे. तर, सदावर्तेंच्या आणखी काही दिवसांची पोलीस कोठडीची मागणी प्रदीप घरत यांनी केली आहे.
तसेच प्रदीप घरत म्हणाले, या प्रकरणी नव्या आरोपीकंडून महत्त्वाची माहिती मिळत आहे. त्यामुळे या पार्श्वभूमीवर सदावर्तेंची चौकशी करणे गरजेचे आहे. त्यामुळे चौकशीसाठी सदावर्तेंना न्यायालयात बोलवण्यात आले असून न्यायालय सदावर्तेंच्या कोठडीसंदर्भात बुधवारी निर्णय घेण्यात येणार आहे.