मुंबई, २५ जून २०२३, प्रतिनिधी : काही दिवसांपूर्वी अभिनेत्री गेहना वशिष्ठ हिचा एक फोटो समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल झाला होता. या फोटोत गेहनासोबत फैजान अन्सारी देखील दिसत होता. विशेष म्हणजे या फोटोत त्या दोघांच्या गळ्यात फुलांचा हार दिसत होता. यामुळे त्या दोघांचे लग्न झाले असून गेहनानं इस्लाम धर्म स्वीकारला आहे, अशी चर्चा समाज माध्यमांवर सुरु झाली. या सगळ्या प्रकरणावर गेहनानं इंस्टग्रामवर एक पोस्ट सामायिक करुन प्रतिक्रिया दिली आहे.
अलीकडेच ‘बहनें’ आणि ‘गंदी बात’ यांसारख्या शोमध्ये दिसलेली अभिनेत्री गेहना वशिष्ठनं समाज माध्यमांवर व्हिडिओ सामायिक केला आहे. यात तिने लिहिलं, ‘मी लग्न केलेलं नाही. तो फोटो वेब सीरिजच्या शूटमधील होता’. पुढे ती म्हणाली,’मी गेहना वसिष्ठ, हे स्पष्ट करते की, मी कधीही कोणाशीही लग्न केले नाही आणि ते फक्त वेबसीरिजचं शूट होते. बाकी काही नाही मी फैजानलाही ओळखत नाही. वेब सीरिजच्या शूटिंगदरम्यान आणि माझ्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनला मी त्याला भेटले होते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मला त्याचे पूर्ण नाव देखील माहित नाही. मी खूप वर्षांपासून माझ्या बॉयफ्रेंडला डेट करत आहे आणि त्याचे नाव राम आहे. त्यामुळे इतर कोणाशीही आणि विशेषत: ज्यांना मी ओळखतही नाही अशा कोणाशीही मी लग्न करणार नाही.’आता ही पोस्ट पाहिल्यानंतर नेटकऱ्यांच्या शंका दूर झाल्या आहेत.
कोण आहे गेहना वशिष्ठ?
गेहना ही अभिनेत्री आहे. आता पर्यंत तिने बऱ्याच हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटात काम केलं असून अनेक जाहिरातीतही ती झळकली आहे. ती समाज माध्यमांवर नेहमीच सक्रिय असते. गेहना नेहमीच तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो ती इंस्टाग्रामवर शेअर करते. तिचे इंस्टाग्रामवर सध्या 1.1 मिलियन फॉलोवर्स आहेत.