महाराष्ट्राच्या राजकारणात लवकरच भूकंप होणार असल्याचं भाकीत मागच्या काही दिवसांपासून वर्तवण्यात येत आहे. अजित पवार नाराज असून ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक आमदारांसह सत्तेत सहभागी होतील, असे दावे केले जात आहेत. त्यातच सकाळ माध्यमसमूहाला दिलेल्या मुलाखतीवर राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली असून कोणाल मुख्यमंत्री व्हायचं असेल तर त्यात गैर काही नसल्याचे म्हटले आहे.
अजित पवार यांच्या या विधानावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी अजितदादांची मुलाखत पाहिली नाही, कोणालाही मुख्यमंत्री व्हायला आवडू शकतं. मुख्यमंत्री व्हायचे असेल तर यात काही गैर नाही. अनेकांना मुख्यमंत्री व्हायला आवडतं पण प्रत्येकजण मुख्यमंत्री होऊ शकत नाही. आमच्या अजितदादांना शुभेच्छा, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. तसेच राज्यातील राजकारणावर बोलताना फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडीत काय चालले आहे हे मला माहीत नाही, मी वारंवार सांगितले आहे की ते स्वतःला ‘वज्रमुठ’ म्हणवून घेतात पण त्यात अनेक तडे आहेत, ते ‘वज्रमुठ’ कधीच असू शकत नाहीत.
सकाळ माध्यमसमूहाला दिलेल्या मुलाखतीमध्ये विधानसभेत 2024 च्या निवडणुकीमध्ये कशाला? आताही आमच्याकडे मुख्यमंत्रीपद ठेवण्याची आमची तयारी आहे. होय, मला मुख्यमंत्री व्हायला 100 टक्के आवडेल,असे निक्षून सांगितले. या वक्तव्यानंतर राजकीय पडसाद उमटण्यास सुरुवात झाली. आज पुण्यातही दादांच्या मुख्यमंत्रिपदाचे बॅनर लागले. मात्र, त्यावरून पक्षाचे चिन्ह नसल्याने राजकीय चर्चाना उधाण आलं आहे.