दिल्ली परिसरातील विमान वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना देणारे नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्ट लवकरच सुरू होणार आहे. 28 मार्च 2026 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज विमानतळाचे उद्घाटन होणार आहे. प्रवेशद्वार, प्रवासी लाउंजपासून ते धावपट्टीपर्यंत सर्वत्र आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे. या विमानतळावर DigiYatra प्रणालीद्वारे पेपरलेस चेक-इनची सुविधा उपलब्ध होणार असून प्रवाशांचा वेळ वाचवण्यासाठी अनेक स्मार्ट सुविधा देण्यात आल्या आहेत.
या विमानतळाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे बसवण्यात आलेली प्रगत ILS (Instrument Landing System) प्रणाली. या प्रणालीमुळे धुके, पाऊस किंवा कमी दृश्यमानता असलेल्या परिस्थितीतही विमाने सुरक्षितपणे उतरू शकतात. विशेषतः उत्तर भारतात हिवाळ्यात निर्माण होणाऱ्या दाट धुक्याच्या पार्श्वभूमीवर ही प्रणाली अत्यंत उपयुक्त ठरणार आहे.
एअरपोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडियाच्या माहितीनुसार, ILS ही अचूक रेडिओ नेव्हिगेशन तंत्रज्ञानावर आधारित प्रणाली आहे. या प्रणालीमध्ये मुख्यतः तीन घटक असतात, लोकलायझर (Localizer), ग्लाइड पाथ (Glide Path) आणि मार्कर्स (Markers). लोकलायझर धावपट्टीच्या शेवटी बसवले जाते आणि ते विमानाला धावपट्टीच्या मध्यरेषेत ठेवण्यास मदत करते. त्यामुळे लँडिंगदरम्यान विमान योग्य दिशेत राहते.
ग्लाइड पाथ हा घटक विमानाला उतरताना योग्य कोनात खाली येण्यास मार्गदर्शन करतो. तर मार्कर्स धावपट्टीपासून ठराविक अंतरावर बसवलेले असतात आणि विमानाला लँडिंगच्या टप्प्यांची माहिती देतात. याशिवाय विमानतळावर DME (Distance Measuring Equipment) प्रणाली, अप्रोच लाइटिंग सिस्टम आणि RVR (Runway Visual Range) यंत्रणाही बसवण्यात आली आहे. यामुळे कमी दृश्यमानतेतही पायलटला धावपट्टीचा अचूक अंदाज घेता येतो.
ILS प्रणाली तीन प्रमुख श्रेणींमध्ये विभागली जाते, CAT I, CAT II आणि CAT III. CAT I प्रणालीमध्ये सुमारे 200 फूट उंचीवरून आणि 800 मीटर दृश्यमानतेत लँडिंग शक्य असते. CAT II प्रणालीमध्ये 100 ते 200 फूट उंचीवरून आणि सुमारे 300 मीटर दृश्यमानतेतही विमान उतरवता येते.
नोएडा इंटरनॅशनल एअरपोर्टवर सर्वात प्रगत CAT III ILS प्रणाली बसवण्यात आली आहे. या प्रणालीमुळे केवळ 50 मीटर इतक्या अत्यल्प दृश्यमानतेतही विमान सुरक्षितपणे उतरू शकते. आवश्यक असल्यास ऑटोमॅटिक लँडिंगची सुविधाही उपलब्ध आहे. त्यामुळे दाट धुके, पाऊस किंवा प्रतिकूल हवामानातही विमानांची लँडिंग अधिक सुरक्षित आणि सुरळीत होणार आहे.