नाशिकमध्ये गुढीपाडव्याचे सर्व सांस्कृतिक आणि पारंपारिक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय नववर्ष स्वागत समितीने घेतला आहे. नववर्षानिमित्त शहरात होणारे अनेक कार्यक्रम रद्द करण्याचा निर्णय नववर्ष स्वागत समितीने घेतला आहे. मात्र, ‘गुढीपाडव्याच्या दिवशी होणाऱ्या कार्यक्रमांना मी परवानगी नाकारली नाही’, असे स्पष्टीकरण पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी दिले आहे.
दरवर्षी नववर्ष स्वागत समितीच्यावतीने शहरात विविध सामाजिक कार्यक्रम राबवले जातात. यंदा देखील गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाबाबत नववर्ष स्वागत समितीकडून पोलिसांकडे परवानगीसाठी पाठपुरावा करण्यात आला होता. मात्र, पाठपुरावा आणि कागदपत्र पुरवून देखील पोलिसांकडून परवानगी मिळाली नसल्याचे स्वागत उत्सव समितीच्या पदाधिकार्यांनी सांगितले होते. मात्र, या कार्यक्रमाच्या परवानगीबाबत मी कुठलीही परवानगी नाकारली नसल्याचा खुलासा पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी केला आहे.
त्यामुळे, आता नाशिकमध्ये नुतन वर्षानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते की नाही, यावर सर्वांचे लक्ष लागले आहे. तसेच राज्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत लक्षणीय घट झाल्यामुळे राज्यांतील कोरोना नियमांमध्ये शिथिलता आली आहे. नुकताच पार पडलेला शिमग्यासाठी कोरोना नियम शिथिल करण्यात आले होते. त्यामुळे आता गुढीपाडव्यासाठी नाशिकमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येतात की नाही, यावर सर्व नाशिककरांचे लक्ष लागले आहे.