औरंगाबादच्या घाटी हॉस्पिटलमध्ये रुग्णांसाठी औषधंच नव्हे, तर उपचारासाठी लागणारी साधनं आणि मशीनही नसल्याचं उघड झालं आहे. यामुळे एकच खळबळ उडालीय. घाटी हॉस्पिटल हे केवळ औरंगाबादमधीलच नव्हे, तर मराठवाड्यातील एक महत्त्वाचे रुग्णालय आहे. गावोगावचे रुग्ण येथे उपचारार्थ येत असतात. इतक्या मोठ्या शासकीय रुग्णालायत औषधं आणि उपचाराची साधनं नसल्याचं समोर आलं आहे.
आज औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात यासंदर्भात तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला जिल्हाधिकारी उदय चौधरी, घाटीच्या डीन डॉ. कानन येळीकर, आमदार इम्तियाज जलील, अतुल सावे आणि संजय शिरसाटसह अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत आमदारांनी प्रश्नांचा भडीमार केल्यानंतर घाटी प्रशासनाला याचे उत्तर देता आले नाही.
घाटीमध्ये व्हेंटीलेटर, सिटी स्कॅन, एमआरआय मशीन बंद आहेत. त्याशिवाय कोणत्याही विभागात औषध नसल्याने गरीब रुग्णांचे हाल होत असल्याचं प्रशासनाने मान्य केले. धक्कादायक म्हणजे कुत्रा चालवल्यानंतर जे रेबीजचे इंजेक्शन द्यावे लागते तेही नसल्याने भर बैठकीत महापालिका आरोग्य अधिकारी आणि घाटीच्या अधिकाऱ्यांनी एकमेकांकडे बोट दाखवले.
या बैठकीत काहीही निष्पन्न झालं नसल्याचं आमदारांचं म्हणणं आहे. मात्र, येत्या काळात मुंबईत बैठक घेऊन हा निर्णय मार्गी लावणार असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.