राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुण्यातील कोरोना परिस्थितीचा आढाव घेतला. त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषद घेत पुण्यात काही निर्णय जाहीर केले आहेत. दिवसेंदिवस राज्यात कोरोना रुग्णाच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे पुण्यात आता मास्क न वापरणाऱ्यांवर कारवाई होणार आहे.
पालकमंत्री अजित पवार म्हणाले, पुण्यात ७४ टक्के नागरिकांनी कोरोना लसीचा दुसरा डोस घेतला. त्यामुळे उर्वरित नागरिकांना कोरोना लस घेण्याचे आवाहन अजित पवारांनी केले आहे. तर पुण्यात लसीकरणाशिवाय प्रवेश नसल्याची घोषणादेखील अजित पवारांनी केली असून नागरिकांनी एन ९५ मास्क (चांगला मास्क) वापरण्याची विनंतीसुद्धा त्यांनी केली आहे.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांमुळे मुंबईनंतर पुण्यातही पहिले ते आठवीच्या शाळा येत्या ३० जानेवारीपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र विद्यार्थ्यांचे ऑनलाईन वर्ग सुरूच राहणार आहेत. तसेच राज्यात सध्या मुलांचे लसीकरण सुरू असून मुलांच्या लसीकरणासाठी चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही पालकमंत्री अजित पवार यांनी सांगितले आहे. तर पुण्यात सध्या १ हजार १०४ कोरोना रुग्ण आहेत. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेत काळजी घेण्याचे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.