विरार : विरार पश्चिमेकडील डॉ. जोगळेकर रुग्णालयात अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. प्रसूतीच्या वेदना होत असताना रुग्णालयाच्या दुर्लक्षामुळे एका 7 महिन्यांच्या गर्भवती महिलेचे नवजात बालक प्रसूतीदरम्यान थेट जमिनीवर पडले. या अपघातात नवजात बाळाला गंभीर जखमी झाली असून त्याच्यावर सध्या ठाणे येथील एनआयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित सात महिन्यांची गर्भवती महिला बुधवारी तीव्र प्रसूती वेदना सुरू झाल्याने विरार पश्चिमेतील डॉ. जोगळेकर रुग्णालयात दाखल झाली होती. प्रसूतीची वेळ जवळ आल्याने तिने वारंवार तेथील डॉक्टर आणि परिचारिकांना “पोटातून बाळ बाहेर येत असल्याची जाणीव होत आहे,” असे सांगितले. मात्र, रुग्णालय प्रशासनाने आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी तिच्या या गंभीर तक्रारीकडे पूर्णपणे दुर्लक्ष केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. तक्रारींकडे दुर्लक्ष झाल्यामुळे महिला उभी असतानाच तिच्या गर्भाशयातून नवजात बालक थेट अडीच ते तीन फूट उंचीवरून कडक जमिनीवर कोसळले.