रत्नागिरी, १८ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील उमरीच्या नीलिमा चव्हाण मृत्यू प्रकरणाला नवे वळण लागले आहे. नीलिमाच्या घरच्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी कारवाई केली आहे. आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याप्रकरणी स्टेट बँकेचा प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड याला अटक करण्यात आली आहे. संग्राम गायकवाड विरोधात आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नीलिमा चव्हाण स्टेट बँकेत दापोली शाखेत कंत्राटी कर्मचारी म्हणून कार्यरत होती. बँकेचा प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड याने नीलिमा नोकरीला लागल्यापासूनच तिच्यावर टार्गेट पूर्ण करण्याचा दबाव टाकला होता. कामावरून काढून टाकू अशा स्वरुपाची धमकी नीलिमाला वारंवार दिली जात होती. या सततच्या धमकीमुळे नीलिमाची झोप उडाली होती. ती व्यवस्थित जेवत नव्हती. सतत बँकेच्या कामाच्या चिंतेत असायची. अखेर नैराश्य आले आणि नीलिमाने टोकाचे पाऊल उचलले. नीलिमाचा मृतदेह १ ऑगस्ट २०२३ रोजी दाभोळच्या खाडीत आढळला.
सामाजिक संघटनांनी नवी माहिती उजेडात येताच नीलिमाच्या आत्महत्येचे प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्याची मागणी सुरू केली आहे.