नांदेडमध्ये जिल्हा परिषदेचे शिक्षक 42 वर्षीय सुनील मोरे यांनी 14 वर्षीय मुलगी सारा आणि 10 वर्षीय मुलगा सुमेध या आपल्या दोन मुलांसह नांदेड–मुदखेड मार्गावरील गोदावरी पुलावरून गाडी नदीत घालून आत्महत्या केली होती. एवढचं नव्हे तर सुनील मोरे यांच्या नावाने एक कथित व्हॉट्सअॅप स्टेटस व्हायरल झाले होते.
ज्यात त्यांनी 2023 ते 2025 या कालावधीत विविध चौकशा, तक्रारी, अपमान आणि बदनामी झाल्याचा उल्लेख करत गट शिक्षणाधिकारी किशन फोले, विस्तार अधिकारी सूर्यकांत बाचे, केंद्रप्रमुख शिवाजी कदम आणि सहकारी शिक्षक दत्ता पवळे यांच्यावर आरोप केले होते. सुनील मोरे याच्या मृत्यू प्रकरणी नांदेड ग्रामीण पोलिसांनी चार जणांवर ॲट्रॉसिटी आणि मृत्यूस कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल केला होता.
यासर्व प्रकरणानंतर नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यात घडलेल्या धक्कादायक घटनेला आता वेगळे वळण मिळाले आहे. दोन मुलांसह कार गोदावरी नदीत पाडून शिक्षक पित्याने आत्महत्या केल्याच्या घटनेत पोस्टमॉर्टेम रिपोर्टमधून मोठा खुलासा झाला आहे. आत्महत्येपूर्वी पित्यानेच आपल्या दोन्ही मुलांच्या छाती आणि पोटावर चाकूने वार करून त्यांची हत्या केल्याचे समोर आले आहे. त्यानंतर मुलांचे मृतदेह कारमध्ये ठेवून कार नदीत पाडल्याचा पोलिसांचा संशय आहे.
या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी मयत सुनील मोरे शिक्षकाविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. दरम्यान, आत्महत्येपूर्वी ठेवलेल्या व्हॉट्सॲप स्टेटसमध्ये काही शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख असल्याने या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे. सुमित मोरे हे हिमायतनगर तालुक्यातील कोटा जिल्हा परिषदेच्या शाळेवर शिक्षक होते. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, या प्रकरणाने नांदेड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.