NEET UG Exam 2026: ऑल द बेस्ट! आज देशभरात वैद्यकीय प्रवेश परीक्षा; 22 लाख विद्यार्थी देणार परीक्षा; ‘या’ नियमांचे पालन अनिवार्य

परीक्षा वेळ, ड्रेस कोड, केंद्रावरील सूचना आणि मानसिक आरोग्यासाठी हेल्पलाईन यामुळे विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. परीक्षा देण्यापूर्वी हे नियम जाणून घेणे अत्यावश्यक आहे.

NEET UG Exam 2026: ऑल द बेस्ट! आज देशभरात वैद्यकीय प्रवेश परीक्षा; 22 लाख विद्यार्थी देणार परीक्षा; ‘या’ नियमांचे पालन अनिवार्य

नवी दिल्ली: नॅशनल टेस्टिंग एजन्सीतर्फे (National Testing Agency, NTA) आज 3 मे 2026, रविवारी देशभरात 'नीट यूजी 2026' (NEET UG) परीक्षेचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी 2 ते संध्याकाळी 5 या वेळेत ही परीक्षा पेन-अँड-पेपर मोडमध्ये एकाच पाळीत पार पडणार आहे. विशेष म्हणजे, दिव्यांग उमेदवारांना परीक्षेसाठी अतिरिक्त वेळ देण्यात आला असून, त्यांना संध्याकाळी 6 वाजेपर्यंत पेपर सोडवता येणार आहे. जगभरातील 5,432 केंद्रांवर ही परीक्षा होणार असून, यावर्षी तब्बल 22.79 लाख उमेदवार त्यांचे नशीब आजमावणार आहेत. यामुळे ही जगातील सर्वात मोठ्या प्रवेश परीक्षांपैकी एक ठरली आहे.

सुरक्षित आणि पारदर्शक परीक्षेसाठी यंत्रणा सज्ज

परीक्षेचे कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी एनटीएने चोख बंदोबस्त केला आहे. या मोहिमेत 2 लाखांहून अधिक कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये 674 सिटी कॉर्डिनेटर्स आणि 6,000 हून अधिक स्वतंत्र पर्यवेक्षकांचा समावेश आहे. गोपनीय साहित्याची सुरक्षित वाहतूक करण्यासाठी जिल्हा प्रशासन आणि पोलीस दलाचे विशेष सहकार्य घेण्यात येत आहे. प्रत्येक केंद्रावर केंद्र अधीक्षक आणि निरीक्षकांची नजर असणार असून, गैरप्रकार रोखण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तैनात करण्यात आली आहे.

केंद्राचा पत्ता तपासताना 'गुगल मॅप'वर अवलंबून राहू नका

उमेदवारांनी त्यांच्या प्रवेशपत्रावर (Admit Card) दिलेल्या केंद्राच्या पत्त्याची नीट खातरजमा करावी, अशी महत्त्वाची सूचना एनटीएने दिली आहे. काही केंद्रांचे पत्ते गुगल मॅपवर चुकीचे दिसत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे केवळ डिजिटल नकाशावर अवलंबून न राहता, प्रवेशपत्रावरील संपूर्ण पत्ता वाचून शक्य असल्यास अगोदरच केंद्राची पाहणी करून घ्यावी. वाहतूक कोंडी, हवामान आणि इतर विलंब टाळण्यासाठी विद्यार्थ्यांनी दुपारी दीड वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर पोहोचणे अनिवार्य आहे.

हेही वाचा: Credit Card Minimum Due: सावधान! क्रेडिट कार्डचे 'मिनिमम ड्यू' भरताय? मग तुम्ही ओढवून घेताय भयंकर आर्थिक संकट; जाणून घ्या त्यामागचे सत्य

ड्रेस कोड आणि शिस्तीचे कडक पालन

परीक्षार्थींसाठी एनटीएने विशिष्ट ड्रेस कोड जाहीर केला आहे. पुरुष उमेदवारांनी कॅज्युअल ट्राउझर किंवा जीन्स आणि चप्पल वापरणे अपेक्षित आहे, बुटांना परवानगी नाकारण्यात आली आहे. तसेच टोपी किंवा मफलर वापरता येणार नाही. महिला उमेदवारांसाठी लेगिंग्ज किंवा साध्या ट्राउझरची परवानगी देण्यात आली असून, त्यांनीही साध्या सँडलचा वापर करावा. विशेषतः हातावर मेहंदी लावणे टाळावे आणि परीक्षा केंद्राच्या आत हँडबॅग किंवा पर्स नेण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे.

मानसिक आरोग्यासाठी हेल्पलाईनचा आधार

परीक्षेचा ताण आणि चिंता यांपासून विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी एनटीएने भावनिक साद घातली आहे. "तुमच्या आयुष्यापेक्षा कोणतीही परीक्षा मोठी नाही," असे सांगत एजन्सीने मानसिक आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. जर कोणत्याही उमेदवाराला प्रचंड दडपण किंवा नैराश्य जाणवत असेल, तर त्यांनी अधिकृत हेल्पलाईन क्रमांक 14416 किंवा 1-800-891-4416 वर त्वरित संपर्क साधावा. विद्यार्थी या लढाईत एकटे नाहीत, असा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे. 

हेही वाचा: Judge Death Case: 'बाबा, आता जगणं कठीण झालंय…'; तरुण न्यायाधीशाने संपवलं जीवन; पत्नीवर गंभीर आरोप, तपासात धक्कादायक खुलासे

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number