नीट (NEET) फेरपरीक्षेपूर्वी राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. नागपूर येथील एका विद्यार्थ्याला 21 जून रोजी होणाऱ्या फेरपरीक्षेसाठी चुकून थेट संयुक्त अरब अमिरातीतील (UAE) अबूधाबी परीक्षा केंद्राचे वाटप झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित विद्यार्थी अब्दुल्लाह याने अर्जात नागपूर, वर्धा आणि भंडारा हे परीक्षा केंद्राचे पर्याय दिले होते. यापूर्वी झालेल्या नियमित परीक्षेसाठी त्याला नागपूरमध्येच केंद्र मिळाले होते. त्यामुळे फेरपरीक्षेसाठी अचानक परदेशातील केंद्र मिळाल्याने तो आणि त्याचे कुटुंब आश्चर्यचकित झाले.
पासपोर्ट नसल्याने परदेश प्रवास अशक्य
विद्यार्थ्याकडे पासपोर्ट नसल्यामुळे अल्पावधीत अबूधाबीला जाऊन परीक्षा देणे शक्य नाही, असे पालकांचे म्हणणे आहे. अवघ्या 24 ते 48 तासांत पासपोर्ट आणि व्हिसा प्रक्रिया पूर्ण करणे व्यवहार्य नसल्याने विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष धोक्यात येण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
NTA वर निष्काळजीपणाचा आरोप
या प्रकारामुळे NTA च्या कारभारावर पुन्हा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. परीक्षेच्या केंद्र वाटपातील या गंभीर चुकीमुळे विद्यार्थ्याचे भविष्य धोक्यात आल्याचा आरोप पालकांनी केला आहे. पालकांनी तातडीने NTA हेल्पलाइनवर तक्रार नोंदवली असून, अधिकाऱ्यांनी ही तांत्रिक चूक असल्याचे मान्य केल्याची माहिती मिळाली आहे. पडताळणीनंतर विद्यार्थ्याला सुधारित प्रवेशपत्र (corrected admit card) देण्यात येईल, असे आश्वासन NTA कडून देण्यात आले आहे.
दरम्याने या घटनेमुळे NEET परीक्षेच्या व्यवस्थापनावर पुन्हा एकदा गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. सुधारित हॉलतिकीट मिळेपर्यंत विद्यार्थी आणि पालक प्रतीक्षेत आहेत.