मुलाने समाजात एक प्रतिष्ठित डॉक्टर म्हणून नाव कमवावे, लोकांचे प्राण वाचवावे, हे एका वडिलांचे एक स्वप्न असावे यात गैर काही नसावे. मात्र, हेच स्वप्न जेव्हा हट्ट आणि असह्य दबावाचे रूप घेते, तेव्हा त्याचा शेवट किती भयंकर होऊ शकतो, याची अंगावर काटा आणणारी आणि नात्यांना काळिमा फासणारी घटना नुकतीच समोर आली आहे. एका बापाने पाहिलेले डॉक्टरकीचे स्वप्न अखेर त्यांच्याच मृत्यूचे कारण ठरले असून, एका 19 वर्षांच्या कोवळ्या तरुणाला थेट खुनी बनवून गेले आहे.
ही धक्कादायक घटना 20 फेब्रुवारी रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास घडली. मनवेंद्र प्रताप सिंह असे या दुर्दैवी पित्याचे नाव असून, ते एका पॅथॉलॉजी लॅबचे मालक होते. आपला मुलगा अक्षत याने 'नीट' (NEET) परीक्षा उत्तीर्ण करून वैद्यकीय क्षेत्रातच पाऊल ठेवावे, अशी त्यांची तीव्र इच्छा होती. अक्षतने बारावीत जीवशास्त्र (Biology) हा विषय घेतला होता, मात्र सध्या तो वाणिज्य शाखेचा (B-Com) विद्यार्थी होता. याच तणावातून बाप-लेकात रोज खटके उडत होते. अखेर एका वादाचे रूपांतर अशा हाणामारीत झाले की, संतापाच्या भरात अक्षतने पहाटे त्याच्या बहिणीच्या डोळ्यांसमोरच वडिलांच्याच रायफलने त्यांना थेट मृत्यूच्या दारात ढकलले.
हत्येनंतर या 19 वर्षांच्या मुलाने जी अमानुष क्रूरता दाखवली, ती एखाद्या सराईत आणि निर्ढावलेल्या गुन्हेगारालाही लाजवणारी आहे. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या स्वतःच्या बापाचा मृतदेह त्याने तिसऱ्या मजल्यावरून फरफटत तळमजल्यावर आणला. तिथे त्याने मृतदेहाचे अत्यंत निर्घृणपणे तुकडे केले. इतकेच नाही तर, वडिलांचे शीर त्याने एका निर्जन स्थळी नेऊन फेकले आणि शरिराचे उर्वरित तुकडे एका निळ्या रंगाच्या प्लास्टिक ड्रममध्ये भरून स्वतःच्याच खोलीत लपवून ठेवले.
'चोराच्या मनात चांदणे' आणि गुन्हेगाराच्या मनात भीती असतेच. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आणि स्वतःवरील संशय दूर करण्यासाठी अक्षतने स्वतःच पोलीस ठाणे गाठले आणि वडील बेपत्ता असल्याची खोटी तक्रार नोंदवली. मात्र, पापाचा घडा भरला होता. सोमवारी संध्याकाळी ज्यावेळी तो खोलीत लपवून ठेवलेल्या शरीराच्या उर्वरित तुकड्यांची कायमची विल्हेवाट लावण्यासाठी निघाला, तेव्हा त्याच्या संशयास्पद हालचालींमुळे तो पोलिसांच्या रडारवर आला. पोलिसी खाक्या दाखवताच या कथित 'डॉक्टर' बनू पाहणाऱ्या मुलाने त्याच्या क्रूर गुन्ह्याची संपूर्ण कबुली दिली.
2018 मध्ये आईच्या निधनानंतर या कुटुंबात केवळ वडील, बहीण आणि अक्षत असे तिघेजण राहत होते. पोलीस उपायुक्त विक्रांत वीर यांनी दिलेल्या माहितीनुसार, केवळ 'नीट' परीक्षेच्या असह्य दबावावरून झालेल्या वादातून ही भयंकर हत्या झाली आहे. सध्या फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळावरून सर्व आवश्यक पुरावे गोळा केले असून मृतदेहाचे मिळालेले तुकडे शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. मात्र, मनवेंद्र यांचे शीर अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाही.
या घटनेने संपूर्ण समाजासमोर आणि विशेषतः पालकांसमोर एक अत्यंत गंभीर प्रश्न निर्माण केला आहे. पाल्यांवर अपेक्षांचे ओझे लादताना आपण त्यांना कोणत्या मानसिक कोंडीत ढकलत आहोत, याचे भान ठेवणे आता काळाची गरज बनली आहे. ही घटना केवळ एक क्राईम रिपोर्ट नसून, अपेक्षांच्या ओझ्याखाली दबून उद्ध्वस्त झालेल्या एका कुटुंबाची भीषण शोकांतिका आहे.