देशभरातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी संबंधित असलेल्या नीट परीक्षेभोवती निर्माण झालेल्या गोंधळाचे गंभीर परिणाम आता समोर येऊ लागले आहेत. वैद्यकीय प्रवेशासाठी घेतल्या जाणाऱ्या नीट परीक्षेचा पेपर फुटल्याची घटना समोर आल्यानंतर राष्ट्रीय परीक्षा संस्थेने परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे अनेक विद्यार्थ्यांमध्ये तणाव आणि नैराश्याचं वातावरण निर्माण झालं असून, वेगवेगळ्या राज्यांतून धक्कादायक घटना समोर येत आहेत.डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी विद्यार्थी अनेक वर्षे कठोर मेहनत घेतात. कोचिंग क्लासेस, अभ्यासाचा ताण, स्पर्धा आणि पालकांच्या अपेक्षा यामध्ये अनेक विद्यार्थी स्वतःला झोकून देतात. अशा परिस्थितीत परीक्षा रद्द झाल्याने अनेक विद्यार्थ्यांचा मानसिक तोल ढासळल्याचं दिसून येत आहे.
उत्तर-पश्चिम दिल्लीतील आदर्श नगर परिसरात राहणाऱ्या 21 वर्षीय विद्यार्थिनीने नैराश्यातून टोकाचं पाऊल उचलल्याची घटना समोर आली आहे. संबंधित विद्यार्थिनीने यंदाच्या परीक्षेत चांगले गुण मिळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली होती. मात्र परीक्षा रद्द झाल्यानंतर ती प्रचंड तणावाखाली गेल्याची माहिती समोर येत आहे.राजस्थानमधील सिकर येथेही अशीच एक दुर्दैवी घटना घडली. प्रदीप मेघवाल या 22 वर्षीय विद्यार्थ्यानेही नैराश्यातून जीवन संपवल्याचं सांगितलं जात आहे. प्रदीपने यापूर्वी दोन वेळा नीट परीक्षा दिली होती आणि यंदा चांगले गुण मिळतील, अशी त्याला आशा होती. त्याच्या कुटुंबीयांनीही त्याच्याकडून मोठ्या अपेक्षा ठेवल्या होत्या. गोव्यातील एका 18 वर्षीय विद्यार्थ्याच्याही मृत्यूची माहिती समोर आली असून, या घटनांमुळे देशभरात चिंता व्यक्त केली जात आहे. विद्यार्थ्यांवर वाढणारा मानसिक ताण आणि स्पर्धेचा दबाव हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे.