मुंबई, ७ ऑगस्ट २०२३, प्रतिनिधी: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलेला नाही. केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर करून सुप्रिया सुळे यांच्या गटाने हा दावा केला आहे. अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच पक्षाच्या अधिकृत निवडणूक चिन्हावर दावा केला आहे. हा दावा फेटाळावा अशी मागणी सुप्रिया सुळे यांच्या गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे.
अजित पवार आणि त्यांच्या समर्थकांनी २ जुलै २०२३ रोजी शिंदे सरकारला पाठिंबा दिल्याचे पत्र राज्यपालांना सादर केले. यानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री या पदाची शपथ घेतली. तसेच राष्ट्रवादीच्या ९ आमदारांनी कॅबिनेटमंत्री म्हणून शपथ घेतली. शिंदे सरकारला असलेला आमदारांना पाठिंबा वाढला. नंतर अजित पवार यांच्यावतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि पक्षाच्या अधिकृत निवडणूक चिन्हावर पहिल्यांदा दावा करण्यात आला. याला उत्तर म्हणून सुप्रिया सुळे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे प्रतिज्ञापत्र सादर केले आहे. अद्याप निवडणूक आयोगाने त्यांचा निर्णय दिलेला नाही. पण अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांच्याकडून परस्पर विरोधी दावे सुरू आहेत. आता निवडणूक आयोग काय निर्णय घेणार याकडे अनेकांचे लक्ष आहे.
याआधी शिवसेना या पक्षावर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोघांनी दावा केला. यानंतर निवडणूक आयोगाने शिवसेना हा पक्ष आणि पक्षाचे अधिकृत निवडणूक याबाबतचा एकनाथ शिंदे यांचा दावा मान्य केला. निर्णय देताना हाच फॉर्म्युला राष्ट्रवादी काँग्रेस प्रकरणात वापरला जाणार की निवडणूक आयोग काही वेगळे निकष विचारात घेणार याकडेही अनेकांचे लक्ष आहे.