अमली पदार्थांच्या आंतरराष्ट्रीय तस्करीविरोधात नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबई विभागाने मोठी कारवाई करत न्यूझीलंडला पाठवण्यात येणारे एकूण 10.990 किलो इफेड्रिन जप्त केले आहे. या प्रकरणात चेन्नई येथील एस. हमीद याला अटक करण्यात आली असून, आंतरराष्ट्रीय कुरिअरच्या माध्यमातून बनावट कागदपत्रांच्या आधारे अमली पदार्थांची तस्करी होत असल्याचा तपासात उलगडा झाला आहे.
एनसीबीला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे 21 आणि 25 जुलै रोजी न्यूझीलंडला पाठवण्यात येणाऱ्या तीन संशयित कुरिअर पार्सलवर नजर ठेवण्यात आली. तपासादरम्यान पहिल्या दोन पार्सलची तपासणी केली असता, फ्लोअर मॅट्स आणि कापडी रोलच्या आत अत्यंत कौशल्याने लपवून ठेवलेले सुमारे 7 किलो इफेड्रिन आढळून आले. तपास अधिक खोलवर गेल्यानंतर संबंधित पार्सलसोबत जोडलेली कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर तपासाची दिशा चेन्नईतील त्रिप्लिकेन परिसराकडे वळली. तेथे छापा टाकून एस. हमीद याला ताब्यात घेण्यात आले.
आरोपीच्या ठिकाणाहून पॅकिंगसाठी वापरले जाणारे साहित्य, डिजिटल वजनकाटा, हीट सीलिंग मशीन, प्लास्टिक पिशव्या, बनावट ओळखपत्रे तसेच विविध डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आली. या साहित्याचा वापर आंतरराष्ट्रीय स्तरावर अमली पदार्थांची तस्करी करण्यासाठी होत असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. आरोपीच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीनुसार एनसीबीने कल्याण येथून आणखी एक संशयित कुरिअर पार्सल अडवले. या पार्सलमध्ये बेडशीट आणि फोटो फ्रेमच्या थरांमध्ये लपवून ठेवलेले 3.990 किलो इफेड्रिन जप्त करण्यात आले. या कारवाईनंतर एकूण जप्त करण्यात आलेल्या इफेड्रिनचे प्रमाण 10.990 किलोपर्यंत पोहोचले.
एनसीबीच्या माहितीनुसार, इफेड्रिनचा वापर बेकायदेशीररीत्या मेथॅम्फेटामाइनसारख्या घातक अमली पदार्थाच्या निर्मितीसाठी केला जातो. त्यामुळे या पदार्थाची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी असल्याचे मानले जाते. या प्रकरणात इफेड्रिनचा मूळ स्रोत, तस्करीचे संपूर्ण नेटवर्क, आर्थिक व्यवहार तसेच या रॅकेटमध्ये सहभागी असलेल्या इतर संशयितांचा शोध घेण्यासाठी एनसीबीकडून पुढील तपास सुरू आहे.