नवी मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात मराठी भाषेचा मुद्दा नेहमीच केंद्रस्थानी राहिला आहे. मराठी भाषा, मराठी शिक्षण आणि मराठी शाळांबाबतचे प्रश्न वेळोवेळी चर्चेत येत असतानाच आता नवी मुंबईतून एक मोठी आणि चर्चेची ठरणारी बातमी समोर आली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या शाळांबाबत मोठा निर्णय घेण्याची तयारी सुरू असल्याची माहिती मिळत आहे. महानगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांचे इंग्रजी माध्यमात रूपांतर करण्याचा प्रस्ताव लवकरच महासभेत मांडला जाणार आहे. हा प्रस्ताव सभागृह नेते सागर नाईक सादर करणार असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आगामी महासभेत शिक्षण प्रसाराशी संबंधित हा प्रस्ताव मांडण्यात येणार आहे. चालू शैक्षणिक वर्षापासूनच या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचा विचार केला जात असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या संदर्भातील अधिक माहिती जय महाराष्ट्र न्यूजच्या प्रतिनिधी कविता लोखंडे यांनी दिली आहे.
या प्रस्तावानुसार, नवी मुंबई महानगरपालिकेच्या मराठी माध्यमाच्या शाळांचे टप्प्याटप्प्याने इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये रूपांतर करण्याचा विचार आहे. शहरात मोठ्या प्रमाणावर मराठी माध्यमाच्या शाळा असल्याने त्यांचे इंग्रजी माध्यमात रूपांतर करण्याचा प्रस्ताव मांडण्यात येणार असल्याचे समोर आले आहे.
या संदर्भात बोलताना सागर नाईक यांनी सांगितले की, गरीब आणि सामान्य कुटुंबातील मुलांनाही इंग्रजी शिक्षण मिळावे, या उद्देशाने हा प्रस्ताव मांडण्यात येत आहे. “जे या निर्णयाला विरोध करत आहेत त्यांनी आधी स्वतःची मुले कोणत्या शाळांमध्ये शिकत आहेत हे तपासावे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, हा प्रस्ताव महासभेत मांडल्यानंतर विरोधकांची भूमिका काय असेल आणि या मुद्द्याला राजकीय वळण कसे मिळते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजकारणात हा मुद्दा पुढील काही दिवसांत चर्चेचा विषय ठरण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.