नवी मुंबई: ढगांच्या कुशीतून सुखाचा प्रवास करून विमानतळावर पाऊल ठेवताना प्रवाशांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद असतो. लवकर घरी पोहोचण्याची आणि आप्तस्वकीयांना भेटण्याची ओढ लागलेली असते. मात्र, नवी मुंबई विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांच्या बाबतीत हे चित्र सध्या तरी पूर्णपणे उलटे दिसत आहे. इथे विमानाची चाके जमिनीला लागताच प्रवाशांचा प्रवास संपत नाही, तर खऱ्या अर्थाने त्यांच्या अग्निपरीक्षेला सुरुवात होते. अद्ययावत सेवांच्या गप्पा मारल्या जात असल्या तरी, विमानातून सुखरूप उतरल्यानंतर प्रत्यक्ष घरापर्यंत पोहोचताना प्रवाशांना अक्षरशः नाकीनऊ येत असल्याचे विदारक वास्तव समोर आले आहे.
आजच्या डिजिटल युगात प्रवासी विमानतळाबाहेर पडताच सर्वात आधी अॅप-आधारित कॅब बुक करण्याला प्राधान्य देतात. मात्र, नवी मुंबई विमानतळ परिसरात अनेक मोबाईल कंपन्यांचे नेटवर्कच गायब असल्याने प्रवाशांची पहिलीच कोंडी होते. ज्या भाग्यवान प्रवाशांना कसेबसे नेटवर्क मिळते, त्यांच्या नशिबी कॅबची ताटकळत वाट पाहणे येते. बुक केलेल्या कॅब वेळेवर येत नाहीत आणि मोजकेच चालक वेळेचे भान पाळताना दिसतात. त्यातच रात्री 11 नंतर सरकारी बस सेवाही बंद होत असल्याने, रात्री-अपरात्री घरी पोहोचण्यासाठी प्रवाशांना मोठी कसरत करावी लागत आहे.
विमानतळावर गर्दीचे नियोजन करण्यासाठी प्रशासनाने 'टोकन प्रणाली' लागू केली आहे, मात्र तीच आता प्रवाशांच्या मुळावर उठली आहे. अॅपवरून कॅब बुक केल्यानंतर प्रवाशांच्या मोबाईलवर एक टोकन येते आणि त्या क्रमांकाच्या आधारे त्यांना 'पिक-अप स्पॉट'वर जाऊन रांगेत उभे राहावे लागते. या प्रक्रियेत सुलभता येण्याऐवजी गोंधळच अधिक वाढला आहे. कॅब उपलब्ध होईपर्यंत अनेक प्रवाशांना 40 मिनिटे ताटकळत उभे राहावे लागत आहे. प्रवासाला गती देण्यासाठी आणलेली ही प्रणाली प्रवाशांचा चांगलाच घाम काढत असल्याचे चित्र आहे.
रात्रीच्या वेळी तर या समस्येचे रूपांतर एका आर्थिक लुटीत होते. मागणी वाढल्याने आणि इतर सार्वजनिक वाहतुकीचे पर्याय बंद असल्याने, अॅपवरून कमी दराचे पर्याय अचानक अनुपलब्ध होतात. परिणामी, प्रवाशांना नाईलाजाने 'प्रिमियम राईड'चा महागडा पर्याय निवडावा लागतो. दुसरा कोणताही पर्याय उरत नसल्याने, नुकतेच एका प्रवाशाला रात्री उशिरा विमानतळावरून विरारपर्यंत जाण्यासाठी तब्बल 6000 रुपये मोजावे लागले आहेत. ही केवळ गैरसोय नसून, प्रवाशांच्या मजबुरीचा उघडपणे घेतलेला गैरफायदा आहे, असा संतप्त आरोप प्रवाशांकडून होत आहे.
येत्या एप्रिल अखेरीस या विमानतळावरून आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करण्याच्या हालचाली वेग घेत आहेत. त्यानंतर प्रवाशांची संख्या थेट दुप्पट होईल आणि आगामी काही महिन्यांत 24 तास उड्डाणांची सुविधाही कार्यान्वित होईल. जर सध्याच्या मर्यादित प्रवाशांना इतक्या भीषण गैरसोयींना सामोरे जावे लागत असेल, तर आंतरराष्ट्रीय उड्डाणांनंतर येथे कोणता गोंधळ उडेल, याची कल्पनाच न केलेली बरी. वाढत्या प्रवासी संख्येचा विचार करून प्रशासनाने घरापर्यंतचा प्रवास ('लास्ट माईल कनेक्टिव्हिटी') सुधारण्यासाठी आताच तातडीने पावले न उचलल्यास, हे नवे विमानतळ प्रवाशांसाठी केवळ एक 'त्रासदायक टर्मिनल' बनून राहील.