नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 25 डिसेंबर रोजी पहिले प्रवासी विमान उड्डाण घेणार असून या महत्त्वाच्या क्षणाची सर्व तयारी आता पूर्णत्वास आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्घाटन केल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांतच या विमानतळाने कार्यान्वयनासाठीची सर्व यंत्रणा सक्षमपणे उभी केली आहे. यासाठी 29 आणि 30 नोव्हेंबर रोजी घेण्यात आलेली प्रवासी सिम्युलेशन चाचणी (Passenger Simulation Test) यशस्वी झाली असून नियमित उड्डाणांसाठी हिरवा कंदील मिळाला आहे.
या चाचणीदरम्यान शेकडो स्वयंसेवकांना प्रवासी मानून विमानतळावरील प्रत्यक्ष प्रवासाची संपूर्ण प्रक्रिया पार पाडण्यात आली. चेक-इन, सुरक्षा तपासणी, बोर्डिंग, बॅगेज क्लेम अशा प्रत्येक टप्प्यांत प्रणालीची कार्यक्षमता तपासण्यात आली. इंडिगो, अकासा एअर आणि एअर इंडिया एक्स्प्रेस यांनी आपल्या टीमसह या प्रक्रियेत भाग घेऊन उड्डाण व्यवस्थापनातील सूक्ष्म बाबींचे मूल्यमापन केले. ही चाचणी एकप्रकारे मोठ्या प्रमाणावर घेण्यात आलेले मॉकड्रीलच ठरली. सुमारे 19,650 कोटी रुपयांच्या खर्चाने उभारलेले New Mumbai International Airport हे देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड विमानतळ म्हणून ओळखले जाणार आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरील प्रवासी गर्दी कमी करण्यासाठी हा नवा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पहिल्या उड्डाणातील प्रवासी कोण असतील आणि पहिले विमान कोणत्या मार्गावर निघणार, याबाबत प्रवाशांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
हेही वाचा: IND vs SA: निराशाजनक कामगिरीनंतर भारताचा दमदार कमबॅक; साऊथ आफ्रिकेवर दणदणीत विजय
दरम्यान, 25 डिसेंबरच्या पहिल्या उड्डाणांसाठी बुकींग आधीच सुरू झाले असून इंडिगो आणि अकासा एअर या दोन्ही कंपन्यांनी नवी मुंबई विमानतळावरून सेवेची नोंदणी सुरू केली आहे. प्रारंभीच्या माहितीत इंडिगोचे काही मार्गावरील भाडे Chhatrapati Shivaji Maharaj International Airport पेक्षा किंचित अधिक असल्याचे दिसून आले, तर अकासा एअरने तुलनेने कमी भाडे ठेवत स्पर्धा वाढवली आहे. प्रवाशांसाठी हे नवे पर्याय अधिक सुलभ व सोयीस्कर ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. इंडिगो नवी मुंबईहून 10 भारतीय शहरांसाठी उड्डाणे सुरू करणार आहे, तर अकासा दिल्ली, कोच्ची, गोवा आणि अहमदाबाद येथे नियमित सेवा देणार आहे. विविध मार्गांची वाढलेली उपलब्धता आणि मुंबई महानगर क्षेत्रातील प्रवाशांना मिळणारी नवी सुविधा यामुळे या विमानतळाचे महत्त्व आणखी वाढणार आहे.
नवी मुंबई विमानतळावरून 25 डिसेंबर रोजी सुटणाऱ्या उड्डाणांसाठी दिल्ली मार्गावर इंडिगोचे भाडे 60274 रुपये तर अकासा एअरचे भाडे 50776 रुपये इतके नोंदवले गेले आहे. नागपूरसाठी इंडिगोचे भाडे 70267 रुपये असून कोच्ची मार्गावर इंडिगो 91116 रुपये आणि अकासा एअर 7373 रुपये इतक्या भाड्यात सेवा देणार आहे. दुसरीकडे, मुंबई CSMIA विमानतळावरून 26 डिसेंबर रोजी सुटणाऱ्या उड्डाणांसाठी दिल्ली मार्गावरील इंडिगोचे भाडे 6116 रुपये, तर अकासाचे 50776 रुपये आहे. नागपूरसाठी इंडिगोचे भाडे 5744 रुपये तर कोच्ची मार्गावर इंडिगो 15434 रुपये आणि अकासा एअर 24160 रुपये इतके भाडे आकारत आहे.
आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालन सुरू होताच महानगरातील हवाई प्रवासाला नवी दिशा मिळणार आहे. अत्याधुनिक सुविधा, अधिक क्षमतेचे टर्मिनल आणि वेगवान कार्यप्रणाली यामुळे प्रवाशांना नव्या अनुभवाची हमी मिळेल, असा तज्ज्ञांचा अंदाज आहे.