पुण्यातील नवले पूल परिसर हा गेल्या अनेक वर्षांपासून झालेल्या अपघातांमुळे सतत चर्चेत असलेला धोकादायक पूल ठरला आहे. वाहतुकीचा अनियमित वेग, रस्त्याची रचना आणि अपुरी उपाययोजना यामुळे हा पूल आता अक्षरशः ‘मृत्यूचा सापळा’ बनल्याची स्थानिकांची भावना आहे. या गंभीर परिस्थितीचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी शिवसेनेच्या (उबाठा गट) नेते वसंत मोरे यांनी नवले पुलाला भेट देत परिसरातील धोकादायक स्थितीची पाहणी केली.
या पाहणीदरम्यान त्यांनी नागरिकांना प्रत्यक्ष परिस्थिती समजण्यासाठी फेसबुक लाईव्ह सुरू केले होते. मात्र लाईव्हदरम्यानच एक थरारक घटना घडली. वसंत मोरे आणि त्यांचे कार्यकर्ते रस्त्याच्या कडेला उभे राहून वाहतुकीच्या अडचणींवर बोलत असताना, अचानक भरधाव वेगात आलेला एक छोटा टेम्पो त्यांच्या अगदी काही अंतर जळवून पुढे गेला. इतक्या जवळून वाहन गेल्याने मोरे आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना धक्का बसला. मोरे यांनी सांगितले की ते लेनच्या सुरक्षित बाजूला उभे राहून फेसबुक लाईव्ह करत होते. मात्र तो टेम्पो सुमारे 100 किमी प्रतितास वेगाने आला असावा, असे त्यांनी नमूद केले. ही घटना त्यांच्या लाईव्हमध्ये पूर्णपणे कैद झाली असून यावरून नवले पुलावरील वास्तविक धोका किती मोठा आहे, हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले.
सुदैवाने या प्रकारात कोणतीही दुखापत झाली नाही. घटनेनंतर वसंत मोरे यांनी त्या टेम्पोचा शोध सुरू असल्याचे सांगितले. इतक्या प्रचंड वेगात वाहन चालवणे सामान्य नाही, त्यामुळे चालकाने मद्य सेवन केले असावे, अशी प्राथमिक शंका त्यांनी व्यक्त केली. या प्रसंगानंतर नवले पुलावरील गंभीर समस्यांकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे अधोरेखित केले. नवले पूल अनेक वर्षांपासून अपघातांसाठी बदनाम आहे. वारंवार अपघात होत असूनही प्रशासनाकडून ठोस आणि दीर्घकालीन उपाययोजना न झाल्याचा मोरे यांनी आरोप केला. या परिसरातून प्रवास करणाऱ्या नागरिकांना सतत भीतीचा सामना करावा लागतो, आणि हा मार्ग वापरणे म्हणजे जीव मुठीत धरून चालण्यासारखे झाले आहे, असे त्यांनी सांगितले.
मोरे यांनी वेगमर्यादेच्या चुकीच्या अंमलबजावणीवरही टीका केली. नियमानुसार या पुलावर वेगमर्यादा 30 ते 40 किमी प्रतितास असायला हवी, पण प्रत्यक्षात 60 किमी प्रतितासाचे फलक लावलेले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना दंड भरावा लागतोच, शिवाय अपघातांचा धोका अधिक वाढतो. योग्य वेगमर्यादा निश्चित करून तिचे काटेकोर पालन होणे अत्यावश्यक असल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले.
एरवी या पुलावर अपघातात सर्वसामान्यांचे प्राण जातात; परंतु आज वसंत मोरे थोडक्यात वाचल्यानंतर या प्रसंगाची शहरात मोठी चर्चा आहे. या घटनेमुळे नवले पुलाच्या धोकादायक स्थितीकडे प्रशासनाने आता तरी गांभीर्याने पाहून तातडीच्या उपाययोजना कराव्यात, अशी नागरिकांचीही अपेक्षा वाढली आहे.