Air India Aircraft Damage: दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (IGI) शनिवारी रात्री निसर्गाच्या लहरीपणाचा फटका हवाई सेवेला बसला. टर्मिनल 2 वर विमाने उभी असताना अचानक आलेल्या मुसळधार पावासामुळे आणि वेगवान वादळाने विमानतळावरील परिस्थिती अनियंत्रित झाली. वादळाचा वेग इतका तीव्र होता की, धावपट्टीच्या आवारात ठेवलेली 'इंडिगो' आणि 'एअर इंडिया इंजिनिअरिंग'ची जमिनीवरील सहाय्यक उपकरणे (Ground Support Equipment) जोराने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे जागची हलली आणि ती तिथे उभ्या असलेल्या एअर इंडियाच्या तीन 'नॅरो-बॉडी' विमानांवर जाऊन आदळली. दिल्ली इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने (DIAL) दिलेल्या माहितीनुसार, या अचानक आलेल्या वादळाची एअर ट्रॅफिक कंट्रोलकडून (ATC) कोणतीही पूर्वसूचना मिळाली नव्हती, ज्यामुळे विमानांजवळील उपकरणे सुरक्षित ठिकाणी हलवण्यास कर्मचाऱ्यांना वेळच मिळाला नाही.
तिन्ही विमाने सेवेबाहेर; सुरक्षा तपासणी सुरू
या अनपेक्षित अपघातानंतर सुरक्षेचा उपाय म्हणून एअर इंडियाने आपली बाधित झालेली तिन्ही विमाने तात्काळ प्रवाशांच्या सेवेतून बाजूला केली आहेत. सध्यातरी या अपघातात कोणत्याही प्रवाशाला किंवा कर्मचाऱ्याला दुखापत झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, यातील दोन विमानांना किरकोळ स्वरूपाचा फटका बसला असून ती दुरुस्तीनंतर लवकरच पुन्हा उड्डाणासाठी सज्ज होतील. मात्र, तिसऱ्या विमानाला जोडणाऱ्या जिन्याच्या (Stairway) भागाला जोरदार फटका बसल्याने त्याचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे हे विमान दीर्घकाळासाठी सेवेबाहेर राहण्याची शक्यता असून, त्याची सखोल तांत्रिक तपासणी केली जात आहे. दरम्यान, या वादळाचा फटका इतर काही विमान कंपन्यांच्या विमानांना आणि धावपट्टीवरील अनेक उपकरणांनाही बसल्याचे समजते.
बंगळुरूहून दिल्लीला येणाऱ्या विमानाच्या इंजिनला आग
दरम्यान, दिल्ली विमानतळावर ही दुर्घटना घडत असतानाच, 21 मे 2026 रोजी बंगळुरूहून दिल्लीला येणाऱ्या एअर इंडियाच्या 'AI2802' या विमानाबाबत आणखी एक थरारक घटना समोर आली आहे. दिल्लीत उतरत असताना या विमानाच्या एका भागाला अचानक आग लागली. मात्र, वैमानिकाने प्रसंगावधान राखत विमानाचे धावपट्टीवर सुरक्षित लँडिंग केले. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'एक्स'वर (ट्विटर) या घटनेला दुजोरा देताना एअर इंडियाने स्पष्ट केले की, विमानातील सर्व प्रवासी आणि चालक दल पूर्णपणे सुरक्षित आहेत. विमान कंपनी सध्या या तांत्रिक बिघाडामागची कारणे शोधण्यासाठी नागरी विमान वाहतूक अधिकाऱ्यांशी समन्वय साधून तपास करत आहे. काही महिन्यांपूर्वीच दाट धुक्यात धावपट्टीवर जात असताना एका बॅगेज कंटेनरची धडक बसून एअर इंडियाच्या अत्याधुनिक 'A350' विमानाचे नुकसान झाले होते, त्यामुळे एअर इंडियाच्या विमानांबाबतच्या सुरक्षा व्यवस्थांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे.