नवी दिल्ली: अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांविरुद्ध मोठी कारवाई केली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली ईडीने सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी 9 एप्रिल रोजी दाखल केलेल्या आरोपपत्राची तपासणी केली आणि या प्रकरणातील पुढील कार्यवाही किंवा सुनावणीसाठी 25 एप्रिलची तारीख निश्चित केली. या प्रकरणात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर नेत्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
नॅशनल हेराल्ड प्रकरणात आरोपपत्र दाखल –
नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने काँग्रेस नेते – सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांविरुद्ध राऊस अव्हेन्यू कोर्टात आरोपपत्र दाखल केले आहे. हे प्रकरण असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) आणि यंग इंडियन प्रायव्हेट लिमिटेडशी संबंधित आहे.
'या' दिवशी होणार सुनावणी –
नॅशनल हेराल्ड मनी लाँड्रिंग प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेस खासदार राहुल गांधी, सोनिया गांधी आणि काँग्रेस ओव्हरसीज प्रमुख सॅम पित्रोदा यांच्याविरुद्ध दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयात खटला दाखल केला आहे. या आरोपपत्रात सुमन दुबे आणि इतरांची नावेही समाविष्ट आहेत. या प्रकरणातील आरोपांची दखल घेण्यासाठी न्यायालयाने 25 एप्रिल ही सुनावणीची तारीख निश्चित केली आहे.
ईडीने दाखल केलेल्या आरोपपत्रावर विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी म्हटलं आहे की, सध्याची सरकारी वकिलांची तक्रार 25 एप्रिल 2025 रोजी या न्यायालयात दखल घेण्याच्या पैलूवर विचार करण्यासाठी ठेवली जाईल. ईडीने मनी लाँड्रिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), 2022 च्या कलम 44 आणि 45 अंतर्गत मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्यासाठी खटला दाखल केला आहे.