Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! PG मध्ये राहणाऱ्या तरुणीची निर्घृण हत्या, परिसरात भीतीचं वातावरण

नाशिकच्या इंदिरानगर परिसरात PG मध्ये राहणाऱ्या २० वर्षीय तरुणीवर भररस्त्यात धारदार शस्त्राने हल्ला झाला.

Nashik Crime: नाशिकमध्ये खळबळ! PG मध्ये राहणाऱ्या तरुणीची निर्घृण हत्या, परिसरात भीतीचं वातावरण

नाशिक शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीची धक्कादायक घटना समोर आली आहे. इंदिरानगर परिसरात पेईंग गेस्ट (PG) म्हणून राहणाऱ्या एका तरुणीची भररस्त्यात धारदार शस्त्राने हत्या करण्यात आल्याने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. रात्री घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी विविध पथके तैनात करण्यात आली आहेत.

रात्री गार्डनजवळ घडली घटना

प्राथमिक माहितीनुसार, इंदिरानगरमधील वनसंपदा सोसायटी परिसरातील गार्डनजवळ रात्री साडेदहाच्या सुमारास ही घटना घडली. मृत तरुणीची ओळख वैष्णवी अनिल आवारे अशी झाली असून ती मूळची जळगाव जिल्ह्यातील अमळनेर येथील रहिवासी होती. शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने ती नाशिकमध्ये राहत होती आणि वनसंपदा सोसायटी परिसरात पेईंग गेस्ट म्हणून वास्तव्यास होती.

धारदार शस्त्राने वार करून आरोपी फरार

घटनास्थळी उपलब्ध माहितीनुसार, वैष्णवी रात्री परिसरातून जात असताना एका तरुणाने तिच्यावर अचानक हल्ला केला. आरोपीने धारदार शस्त्राने तिच्यावर सलग वार केल्याने ती गंभीर जखमी होऊन रस्त्यावरच कोसळली. हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून पसार झाला.

घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी रस्त्याच्या कडेला रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या तरुणीला पाहताच पोलिसांना माहिती दिली. पोलिसांचे पथक काही वेळातच घटनास्थळी दाखल झाले आणि परिसराची पाहणी करून पुढील तपासाला सुरुवात केली.

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला

पोलिसांनी पंचनामा पूर्ण करून मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवला. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज, स्थानिक साक्षीदार आणि तांत्रिक पुराव्यांची मदत घेतली जात आहे.

हत्येनंतर प्रकरणाला नवे वळण

काल रात्री तरुणीची हत्या झाल्यानंतर पहाटेच्या सुमारास इंदिरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणाचा मृतदेह आढळून आला. प्राथमिक माहितीनुसार, हा तरुण वैष्णवी हत्येप्रकरणातील संशयित असून त्याने आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. यापूर्वी या हत्येमागे प्रेमप्रकरण असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला होता. दरम्यान, मृत तरुणाचा आणि हत्येचा नेमका संबंध काय, तसेच मृत्यूचे कारण काय, याचा सखोल तपास इंदिरानगर पोलीस करत आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number