मुंबई : कुंभमेळ्याच्या तयारीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणातील वृक्षतोडीचा मुद्दा राज्यात चांगलाच गाजत आहे. पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था आणि स्थानिक कार्यकर्त्यांसह अभिनेता सयाजी शिंदे यांनीही या मुद्द्यावर पुढाकार घेत तीव्र विरोध दर्शवला आहे. नुकतेच त्यांनी नाशिकमधील वृक्षतोड रोखण्यासाठी आंदोलनात सहभाग नोंदवत राज्य सरकारकडे कठोर प्रश्न उपस्थित केले होते.
या पार्श्वभूमीवर आज सयाजी शिंदे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे चित्रपट सेना अध्यक्ष अमेय खोपकर हे राज ठाकरे यांच्या दादर येथील ‘शिवतीर्थ’ या निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले आहेत. दोघांनी राज ठाकरेंशी या प्रकरणावर चर्चा करण्याची तयारी दाखवली असून या भेटीकडे राज्याच्या राजकीय आणि सामाजिक वर्तुळाचे लक्ष लागले आहे. कुंभमेळ्यातील विकासकामांच्या नावाखाली नाशिकमध्ये होत असलेल्या वृक्षतोडीला पर्यावरण संघटनांनी जोरदार विरोध केला आहे. हजारो झाडे तोडली जात असल्याचा आरोप करत पर्यावरण कार्यकर्ते आंदोलनात उतरले आहेत.
दरम्यान सयाजी शिंदे यांनीही सरकारकडे “पर्यावरणाचा बळी देऊन विकास का?” असा सवाल उपस्थित केला होता. राज ठाकरे यांच्याशी होणाऱ्या या आजच्या भेटीत सयाजी शिंदे आपल्या अपेक्षा, मागण्या आणि आंदोलनकर्त्यांची भूमिका स्पष्ट करणार असल्याची माहिती मिळते. राज ठाकरे यांनी नाशिकमधील कुंभमेळ्यासाठी होणाऱ्या 1800 झाडांच्या तोडीला तीव्र विरोध दर्शवत सरकारवर गंभीर आरोप केले होते. मागील महापालिका कारभारात एकही झाड न तोडता उत्कृष्ट पायाभूत सुविधा उभारल्या, मग आता वृक्षतोड का आवश्यक आहे, असा त्यांनी सवाल केलेला. साधूंच्या नावाखाली उद्योगपतींना फायदा देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचा आरोप करत त्यांनी नाशिककरांना ठाम राहण्याचे आवाहन केले. संघर्ष वाढल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागरिकांच्या पाठीशी उभी असेल, अशी त्यांची भूमिका राहिली आहे.
आता आजच्या या भेटीतून वृक्षतोडीच्या मुद्द्यावर पुढील रणनीती ठरू शकते, अशी शक्यता व्यक्त होते. दरम्यान, सयाजी शिंदे आणि अमेय खोपकर यांची राज ठाकरे यांच्याशी झालेली भेट या प्रकरणाला नवे राजकीय वळण देऊ शकते का, हे पाहणे सुद्धा महत्वाचे ठरणार आहे. राज्यातील पर्यावरणप्रश्न, नाशिकचा विकास आराखडा आणि कुंभमेळ्याच्या तयारीतील पर्यावरणीय चिंता या सर्व मुद्द्यांवर पुढील काही दिवस महत्त्वाच्या घडामोडी दिसण्याची शक्यता आहे.
हेही वाचा: Maharashtra Weather Alert: राज्यात गारठ्याची चाहूल; नागपूरसह अनेक शहरांत तापमानात मोठी घट