नाशिक: वाहतुकीचे नियम पाळले गेले नाहीत तर अपघातांची संख्या वाढते, हे लक्षात घेऊन नाशिक पोलिस प्रशासनाने महत्त्वाचे आणि कडक पाऊल उचलले आहे. शहरातील वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी तसेच वाहतुकीत शिस्त निर्माण करण्याच्या उद्देशाने नियम मोडणाऱ्या वाहनचालकांना आता थेट ऑनलाइन चलन देण्यात येणार असून जागेवरच दंड आकारला जाणार आहे.
नाशिक पोलीस आयुक्तालयाच्या नियंत्रण कक्षातून (Control Room) सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहतुकीवर बारकाईने नजर ठेवली जाणार आहे. अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने वाहतुकीचे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांवर स्वयंचलित पद्धतीने कारवाई करण्यात येणार आहे.
शहरातील प्रमुख चौक, सिग्नल पॉईंट तसेच अपघातप्रवण ठिकाणी उच्च क्षमतेचे सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले असून हे कॅमेरे 24 तास वाहतुकीवर लक्ष ठेवणार आहेत. वाहन सिग्नल तोडणे, स्टॉप लाईन ओलांडणे किंवा वाहतुकीच्या सूचनांकडे दुर्लक्ष करणे यांसारख्या प्रकारांची नोंद प्रणालीद्वारे आपोआप केली जाणार आहे. कॅमेऱ्यांमधून मिळालेली माहिती थेट नियंत्रण कक्षात पोहोचणार असून वाहन क्रमांक ओळखणारी अत्याधुनिक यंत्रणा संबंधित वाहनाची माहिती तत्काळ तपासून ई-चलन तयार करणार आहे.
विशेष म्हणजे, यापूर्वी वाहतूक पोलिसांच्या प्रत्यक्ष उपस्थितीतच कारवाई केली जात होती. मात्र आता मानवी हस्तक्षेप कमी करून संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि डिजिटल करण्यात आली आहे. त्यामुळे नियमभंग करणाऱ्यांना कोणतीही सूट मिळणार नसून कारवाई अधिक वेगवान आणि अचूक होणार आहे. वाहतुकीतील बेफिकीरपणा, सिग्नल जंपिंग आणि घाईगडबडीत होणारे अपघात कमी करण्यासाठी ही प्रणाली प्रभावी ठरणार असल्याचा विश्वास पोलीस प्रशासनाने व्यक्त केला आहे.
या मोहिमेंतर्गत प्रामुख्याने रेड लाईट व्हायोलेशन आणि स्टॉप लाईन व्हायोलेशन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर थेट संदेश पाठवण्यात येईल तसेच संबंधित खात्यावर ऑनलाइन दंड आकारला जाणार असल्याची माहिती नाशिक पोलिसांकडून देण्यात आली आहे.
तंत्रज्ञानाचा आधुनिक वापर करून नाशिककरांमध्ये वाहतुकीची शिस्त निर्माण करण्यासाठी पोलीस प्रशासन पुढाकार घेत असून आता वाहन चालवताना नियमांचे पालन करणेच नागरिकांसाठी अधिक फायदेशीर ठरणार आहे.